महिला सुधारगृहातून दोन मुलींचे पलायन
By Admin | Updated: December 5, 2014 00:59 IST2014-12-05T00:57:27+5:302014-12-05T00:59:19+5:30
जालना: येथील शासकीय महिला सुधारगृहातून दोन अल्पवयीन मुलींनी पलायन केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी घडली.

महिला सुधारगृहातून दोन मुलींचे पलायन
जालना: येथील शासकीय महिला सुधारगृहातून दोन अल्पवयीन मुलींनी पलायन केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी घडली. दरम्यान सहा दिवस झाले तरी अद्याप या मुलींना शोधण्यास पोलिसांना यश आले नाही.
घरातून प्रियकरासोबत पळून गेलेल्या शहरातील एका अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी शोध घेवून त्या मुलीस दोन महिन्यापूर्वीच शासकीय महिला सुधारगृहात ठेवले होते. अंबड तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी मागील आठ महिन्यांपासून सुधारगृहात होती. या दोन्हीही मुली २८ नोव्हेंबरपासून सुधारगृहातून गायब आहेत. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विभूते यांनी दिली. महिला सुधारगृहाच्या अधीक्षिका म्हणाल्या की, शहरातील ती मुलगी प्रियकरासोबत पळून गेलेली असल्याने घरच्याकडून आपल्याला धोका आहे, असे सांगत होती. तसेच आई- वडील वारंवार घरी नेण्यासाठी येत, मात्र ती त्यांना नकार देत. अंबड तालुक्यातील मुलगी ३ महिन्यांनी १८ वर्षाची होणार होती. तिच्या वागणुकीत सुधार झाला होता. या मुलीनी असे का केले हे माहीत नाही. आम्ही रेल्वे स्टेशन, बसस्थानक येथे शोध घेतला. मात्र ती न सापडल्याने कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे अधीक्षिकांनी सांगितले. (वार्ताहर)