दोन उपोषणार्थी चढले टॉवरवर
By Admin | Updated: December 9, 2015 23:56 IST2015-12-09T23:29:37+5:302015-12-09T23:56:48+5:30
बीड : धारुर तालुक्यातील चिंचपूर येथे पाणीपुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ दिवसांपासून उपोषण सुरु होते.

दोन उपोषणार्थी चढले टॉवरवर
बीड : धारुर तालुक्यातील चिंचपूर येथे पाणीपुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ दिवसांपासून उपोषण सुरु होते. बुधवारी उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील टॉवरवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. गुन्हे नोंदविण्याच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्ते खाली आले.
चिंचपूरमध्ये २००९- १० मध्ये भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठा योजना राबविली होती. या योजनेच्या कामात लाखोंचा अपहार झाल्याचा आरोप करुन गावातील काही नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. चव्हाण यांनी समिती नेमून चौकशीचे आदेश काढले. याउपरही उपोषणकर्त्यांनी माघार घेतली नाही. बुधवारी उपोषणाचा दहावा दिवस होता. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशोक हंडीबाग, सदाशिव साखरे हे कार्यालय आवारातील राष्ट्रीय विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) टॉवरवर चढले. त्यांनी सोबत दोरखंडही नेला होता. सकाळी सात वाजता काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले. त्यानंतर सीईओ नामदेव ननावरे, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपअधीक्षक गणेश गावडे पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. चव्हाण तेथे आले. त्यांनी उपोषणकर्त्यांना टॉवरवरुन खाली उतरण्यासाठी गळ घातली;परंतु गुन्हे नोंद होईपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा त्यांनी दिला. ननावरे यांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर उपोषणकर्ते खाली उतरले. (प्रतिनिधी)
सीईओ ननावरे यांनी पाणीपुरवठा योजनेच्या अंमजबजावणीत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाईचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपअभियंता एम. व्ही. थोरात यांना गुन्हा नोंदविण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमले;परंतु रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. गुन्हा नोंदविण्याच्या मागणीवर उपोषणकर्ते ठाम आहेत. त्यांनी ‘शोलेस्टाईल’ आंदोलनानंतर पुन्हा उपोषण सुरुच ठेवले आहे.