महापालिकेचे दोन कर्मचारी बडतर्फ
By Admin | Updated: July 7, 2014 00:20 IST2014-07-07T00:07:26+5:302014-07-07T00:20:24+5:30
नांदेड : महापालिकेतील बीएसयुपी विभागातील दोन कर्मचाऱ्यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या कारणावरून आयुक्त जी़ श्रीकांत यांनी सेवेतून बडतर्फ केले़ तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश दिले़

महापालिकेचे दोन कर्मचारी बडतर्फ
नांदेड : महापालिकेतील बीएसयुपी विभागातील दोन कर्मचाऱ्यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या कारणावरून आयुक्त जी़ श्रीकांत यांनी सेवेतून बडतर्फ केले़ तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश दिले़
बीएसयुपी विभागातील विजय मोहन तोटावाड हे वसुली लिपिक म्हणून काम पाहतात़ लाभार्थ्यांकडून वसूल केलेल्या रक्कमेतून ४ लाख ८५ हजार ५०० रूपयांचा अपहार करून ही रक्कम कार्यालयात उशिराने भरणा केली़ त्यामुळे त्यांना यापूर्वीच निलंबित केले होते़ विभागीय चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दोषारोप सिद्ध केल्याचा अहवाल सादर केला़ त्यानुसार विजय तोटावाड यांना महापालिका सेवेतून लिपिक या पदावरून पुढे नोकरी मिळण्यास सामान्यपणे अपात्र होईल, अशा प्रकारे सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याचे आदेश आयुक्तांनी ४ जुलै रोजी दिले़
दुसऱ्या प्रकरणात मनपाचे कर्मचारी राजू मुंजाजी कांबळे हे क्षेत्रिय कार्यालय क्रं़ ३ मध्ये कार्यरत होते़ मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कराची वसूल केलेली रक्कम महापालिकेकडे वर्ग न करता त्यांनी अपहार केला होता़ त्यामुळे त्यांनाही निलंबित केले होते़ विभागीय चौकशीत त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले़ त्यामुळे राजू कांबळे यांना मनपा सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले़ (प्रतिनिधी)