कारागृह पोलीस भरतीत दोन डमी उमेदवार

By Admin | Updated: April 27, 2016 00:33 IST2016-04-27T00:03:26+5:302016-04-27T00:33:46+5:30

औरंगाबाद : ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कारागृह पोलीस भरतीत दुसऱ्याच्या नावावर दोन जण आल्याचे उघड झाले.

Two dummy candidates in prison recruitment | कारागृह पोलीस भरतीत दोन डमी उमेदवार

कारागृह पोलीस भरतीत दोन डमी उमेदवार

औरंगाबाद : ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कारागृह पोलीस भरतीत दुसऱ्याच्या नावावर दोन जण आल्याचे उघड झाले. याप्रकरणी चार जणांविरोधात सिडको पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलीस मैदानावर कारागृह पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर छाती क्रमांक वितरित करण्यात येत होता. सकाळी दहा वाजेच्या सुमारास अधिकारी उमेदवारांचे फोटो पाहून त्यांना छाती क्रमांक देत होते. त्यावेळी विजयसिंह महेर (रा. संजरपूरवाडी, भिवगाव, ता. वैजापूर) या उमेदवाराचा अर्जावरील फोटो व प्रत्यक्ष चेहरा यामध्ये फरक वाटत होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. अप्पर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यास दुसऱ्या दिवशी अन्य पुरावे घेऊन येण्यास सांगितले. परंतु तो उमेदवार आलाच नाही.
पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी गुन्हे शाखेचे फ ौजदार पी. डी. भारती यांना त्याच्या भिवगाव या गावी पाठविले. त्या उमेदवाराचा फोटो त्याच्या वडिलांना दाखविला, तर वडिलांनी हा माझ्या मुलाचा फोटो नसल्याचे सांगितले. त्यावरून विजयच्या नावावर दुसराच उमेदवार आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विजय व डमी उमेदवाराचा शोध घेण्यात येत आहे.
दुसऱ्या घटनेत जोडवाडी येथील संजय जारवाल हासुद्धा भरतीसाठी आला होता. सोमवारी त्याची शारीरिक चाचणी होती. कागदपत्रांची तपासणी क रून त्यास छाती क्रमांक देऊन मैदानावर पाठविण्यात आले. क्रमांक देताना पोलीस छायाचित्रकाराने त्याचे फोटो घेतले. परंतु शारीरिक चाचणीसाठी त्याचे वेळोवेळी नाव पुकारूनही तो आला नाही.
फोटोची पडताळणी करून पाहिली असता संजयच्या जागेवर दुसराच उमेदवार आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी विचारपूस सुरू केली असता पकडल्या जाण्याच्या भीतीमुळे संजयचा डमी पसार झाला. अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार भारती व भाऊसाहेब वाघ यांनी दोन मूळ उमेदवार व दोन डमी, अशा चार जणांविरोधात सिडको ठाण्यात तक्रार दिली.
अकॅडमीचा संचालक अटकेत
भरती प्रक्रियेदरम्यान मैदानावर फिरण्यास मज्जाव असतानाही, फुलंब्री येथील कॉन्फिडन्स पोलीस अकॅ डमीचा संचालक फिरताना आढळला. त्यामुळे पोलिसांनी त्यास अटक करून त्याच्या विरोधात सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविला.
गणेश भिवरे (२५) असे त्या संचालकाचे नाव आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर कारागृह पोलीस भरती सुरू आहे. उमेदवार व कर्मचाऱ्यांशिवाय कुणालाही या मैदानावर जाता येत नाही. मंगळवारी महिला उमेदवारांची भरती सुरू होती.
पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी व अप्पर अधीक्षक जी. श्रीधर यावर लक्ष ठेवून होते. त्यांना एक संशयित फिरताना दिसून आला. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे चार ते पाच मोबाईल सापडले.
पोलिसांनी विचारपूस केली असता, त्याची फुलंब्री येथे अकॅ डमी असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या अकॅडमीच्या काही महिला उमेदवार भरतीसाठी आल्या होत्या. त्यामुळे तो मैदानावर आला होता. याप्रकरणी पोलीस नाईक आघाडे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Two dummy candidates in prison recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.