ऊस वाहतूक ट्रॅक्टरवरील दोघे चालक ठार
By Admin | Updated: November 21, 2014 00:27 IST2014-11-20T21:57:20+5:302014-11-21T00:27:36+5:30
सातारा तालुका : दोन अपघातांत ११ जण जखमी; मृत नगर, औरंगाबाद जिल्ह्यांतील

ऊस वाहतूक ट्रॅक्टरवरील दोघे चालक ठार
सातारा : सातारा तालुक्यात विविध दोन ठिकाणी झालेल्या अपघातांत दोघेजण ठार तर सुमारे ११ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहीची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, गोजेगाव येथील अपघातात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवरील दोघे चालक जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला. चालक हे अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सातारा तालुक्यातील गोजेगाव हद्दीत इरिगेशन कॉलनीजवळ अपघात झाला. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडलेल्या होत्या. त्यामध्ये ऊस भरलेला होता.
या ट्रॉल्या घेऊन ट्रॅक्टर सातारा बाजूकडून शेंद्रे कारखान्याकडे जाण्यासाठी येत होता. गोजेगाव हद्दीत आल्यावर ऊस भरलेल्या ट्रॉलीची मागील कडी तुटली. त्यामुळे टॅ्रक्टरवरील दोघे चालक खाली उतरून मागे आले. त्यावेळी ट्रॉलीला दगड लावताना पाठीमागून भरधावपणे कार (एमएच ०४ इडब्लू २३९३) आली. या कारने दोघा चालकांना ठोकरले. दोघेही चालक टॉलीखाली गेले व कारही ट्रॉलीत अडकली. या अपघातात दोघेही चालक जागीच ठार झाले.
बाळू एकनाथ सोनावणे (वय ४०, रा. पालवी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) आणि अंबादास एकनाथ वैरागर (वय ३०, रा. शेवगाव, जि. अहमदनगर) अशी मृत चालकांची नावे आहेत.
दरम्यान, कारमधील चालक संतोषकुमार बाळकृष्ण तारू (वय ३६, रा. तासगाव, ता. सातारा), राजेशकुमार बाळकृष्ण तारू (वय ३४), जयश्री राजेशकुमार तारू (वय ३२), धनश्री राजेशकुमार तारू (वय ६, तिघेही रा. श्रीनगर वागळे इस्टेट, ठाणे) तसेच भागुबाई लक्ष्मण शिर्के (वय ५०, रा. कुसुंबी, ता. जावळी) हे जखमी झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार डी. डी. कदम, एन. डी. चव्हाण अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
टेम्पोच्या अपघातात जखमी
गुरुवारी पहाटेच्या सुमारास साताऱ्याजवळ खिंडवाडी येथे महामार्गावर अपघात झाला. टेम्पो (एमएच १२ जीटी ९०१५) डिव्हाइडरला धडकून हा अपघात झाला. यामध्ये राघवेंद्र सिद्रामप्पा बकलगी (वय २८) आणि रेखा राघवेंद्र बकलगी (वय २३, दोघेही रा. खिंडवाडी, सातारा. मूळ रा. बकलगी, ता. अफजलपूर, जि. गुलबर्गा) तसेच तात्यासो माणिक माने (वय २७), पुंडलिक सलगरे (वय २७) आणि चालक सोमनाथ सगर (वय ३०, तिघेही रा. हडपसर पुणे) आणि भाग्यश्री (वय ४०, पूर्ण नाव नाही. रा. खडकी, पुणे) हे जखमी झाले. या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.