दोन डॉक्टरांना घाटीत मारहाण
By Admin | Updated: August 3, 2016 00:18 IST2016-08-03T00:12:58+5:302016-08-03T00:18:35+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना मारहाणीचे सत्र काही केल्या थांबत नसल्याचे दिसते. रुग्ण दगावला कसा, अशी विचारणा करीत नातेवाईकांनी दोन निवासी

दोन डॉक्टरांना घाटीत मारहाण
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना मारहाणीचे सत्र काही केल्या थांबत नसल्याचे दिसते. रुग्ण दगावला कसा, अशी विचारणा करीत नातेवाईकांनी दोन निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे मारहाणीनंतर नातेवाईकांनी घाटीतून पळ काढला. या घटनेमुळे पुन्हा एकदा निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भोकरदन येथील दगडाबाई साबळे (६७) यांना अतिसाराच्या त्रासामुळे उपचारासाठी ३१ जुलै रोजी रात्री ११ वाजता घाटीत दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक ६ मध्ये उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान १ आॅगस्ट रोजी रात्री त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
याविषयी रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. यावेळी नातेवाईकांनी रुग्ण कसा दगावला, अशी विचारणा केली. दरम्यान रुग्णाच्या खाटेवर मुंग्या आढळून आल्याने नातेवाईक अधिक संतापले. यावरून नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये वाद सुरू झाला. वादाचे मारहाणीत रूपांतर झाले. यावेळी निवासी डॉक्टर नीलेश वाघ आणि डॉ.विनोद तोतेवाड यांना नातेवाईकांनी मारहाण केली. मारहाणीनंतर प्रकरण अंगलट येऊ नये, म्हणून मृतदेह घाटीतच सोडून नातेवाईकांनी पळ काढला. या घटनेमुळे सर्व निवासी डॉक्टरांनी तीव्र संताप व्यक्त केला. याविषयी माहिती मिळताच रात्री उशिरा अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत म्हस्के, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुहास जेवळीकर, विभागीय शासकीय कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी घाटीत धाव घेतली. यावेळी निवासी डॉक्टर संपावर जाऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. लोखंडी हत्याराने मारहाण टाळण्यासाठी मेटल डिटेक्टर बसविण्याची मागणी निवासी डॉक्टरांनी केली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी मंगळवारी दुपारी मृतदेह ताब्यात घेतला, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुहास जेवळीक र यांनी दिली.