दोन दिवसांत हळदीचे भाव ५५०० ते ६९०० वर
By Admin | Updated: June 11, 2017 00:29 IST2017-06-11T00:23:29+5:302017-06-11T00:29:34+5:30
नांदेड : सध्या खरीप पेरणीचा हंगाम सुरु झाल्यामुळे शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असल्याने नवा मोंढा बाजारात हळदीची आवक मंदावली आहे.

दोन दिवसांत हळदीचे भाव ५५०० ते ६९०० वर
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : सध्या खरीप पेरणीचा हंगाम सुरु झाल्यामुळे शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असल्याने नवा मोंढा बाजारात हळदीची आवक मंदावली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत हळदीचे भाव ५५०० ते ७ हजार रुपयापर्यंत पोहोचले आहेत.
मे महिन्यात खत-बियाणांची खरेदी करुन ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात आणली. त्यामुळे गेल्या महिन्याअखेर जवळपास २ लाख ४० हजारांवर पोती हळदीची बाजारपेठेत आवक झाली होती. मात्र आता शेतकरी पेरणीसाठी मशागतीच्या कामात व्यस्त झाल्याने गेल्या काही दिवसांपासून आवक कमी झाली आहे. त्यामुळे हळदीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.
आजघडीला जवळपास जिल्हाभरातील सर्व शेतकऱ्यांची हळद काढली असून पेरणीच्या तयारीसाठी बळीराजा मशागतीत गुंतला आहे. पेरणीसाठी बी-बियाणे, खते व औषधांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेतही शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. मागच्या पंधरा दिवसांपासून हळदीचे भाव ५ हजार ते ६ हजार रुपयांवर येऊन ठेपले होते, परंतु आवक घटल्याने शुक्रवारी ७ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत लिलाव बाजारात हळदीची विक्री झाली. त्यामुळे दरात वाढ होण्याचे चित्र दिसत आहे.
मोंढा यार्डामध्ये दिवसाकाठी जवळपास ४ ते ५ हजार क्विंटल हळदीची आवक होत होती, मात्र आता एक ते दीड हजार पोतीच हळद दाखल होत आहे. गतवर्षीचा विचार केल्यास या हंगामात हळदीची मोठी आवक वाढल्याचे दिसत आहे.