शहरात दोन दिवस निर्जळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:15 IST2017-08-17T01:15:58+5:302017-08-17T01:15:58+5:30
जायकवाडी येथून औरंगाबाद शहरासाठी पाणीपुरवठा करणाºया पंपगृहाच्या वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यास मनपा प्रशासन जबाबदार असून, याबाबत महावितरणच्या नावाने खापर फोडण्यात येत असल्याचा खुलासा सहायक कार्यकारी अभियंता रवींद्र गायकवाड यांनी केला

शहरात दोन दिवस निर्जळी
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : जायकवाडी येथून औरंगाबाद शहरासाठी पाणीपुरवठा करणाºया पंपगृहाच्या वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यास मनपा प्रशासन जबाबदार असून, याबाबत महावितरणच्या नावाने खापर फोडण्यात येत असल्याचा खुलासा सहायक कार्यकारी अभियंता रवींद्र गायकवाड यांनी केला आहे.
मनपाने त्यांच्या विद्युत उपकेंद्राची डागडुजी (मेन्टेनन्स) वेळच्या वेळी केल्यास वीजपुरवठा खंडित न होता औरंगाबाद शहरास वेळेवर पाणीपुरवठा करता येईल, असे म्हणत गायकवाड यांनी मनपाचे कानही टोचले. बुधवारी त्यांनी मनपाच्या वीज केंद्राची पाहणी केली तेव्हा ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. महापारेशनच्या उपकेंद्रापासून मनपाच्या उपकेंद्रापर्यंत ३३ केव्ही वाहिनीची देखभाल कंपनीमार्फत करण्यात येते. मनपाच्या पाणीपुरवठा उपकेंद्राच्या सुरुवातीला महावितरणतर्फे अद्ययावत मीटरिंग यंत्रणा लावण्यात आलेली आहे. महापारेशन उपकेंद्र ते महावितरण मीटरपर्यंतची वीजपुरवठ्याची जबाबदारी महावितरण प्रशासनाची असते. मनपा उपकेंद्राची देखभाल व दुरुस्तीकडे, संचालन व सुव्यवस्थेकडे मनपाने दुर्लक्ष केल्यामुळे वाहिनीवर किंवा मीटरमध्ये वारंवार बिघाड होत असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. बुधवारी मनपाच्या मीटरमधील केबल दोन ठिकाणी नादुरुस्त झाल्याने महावितरणच्या लाइनवरदेखील फॉल्ट झाला. केबल फॉल्ट हा आर्थिंग व इतर देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे झाल्याचे चाचणी अभियंता विवेक थोरवे यांनी सांगितले.