दोन दिवसात आठ जनावरांचा फडशा
By Admin | Updated: December 25, 2016 23:50 IST2016-12-25T23:48:47+5:302016-12-25T23:50:48+5:30
अंबाजोगाई : दाट झाडी असलेल्या अंबाजोगाईच्या बुट्टेनाथ परिसरात हिंस्र श्वापदांनी धुडगूस घातला

दोन दिवसात आठ जनावरांचा फडशा
अंबाजोगाई : दाट झाडी असलेल्या अंबाजोगाईच्या बुट्टेनाथ परिसरात हिंस्र श्वापदांनी धुडगूस घातला असून, मागील ४८ तासांमध्ये दोन गाई आणि सहा शेळ्यांचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात वाघ असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
या गाई शेख सलीम शेख फरीद यांच्या मालकीच्या होत्या. दोन दिवसांपूर्वी त्या बेपत्ता झाल्याने त्यांचा शोध घेताना या गाई आणि अन्य जनावरे मृतावस्थेत आढळून आली. प्राथमिक दर्शनी या जनावरांचे एखाद्या हिंस्र श्वापदाने लचके तोडल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षापासून या भागात सातत्याने अशा घटना होत असून, अद्याप या श्वापदाचा शोध लागलेला नाही.
दोन वर्षांपूर्वी या परिसरात वाघ असल्याची चर्चा होती. वन विभागाने पिंजराही बसवला होता; मात्र हाती काहीच न लागल्याने अफवा कायम राहिली. शेतातील जनावरे फस्त होत असल्याने वाघ असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. वन विभागाने मात्र वाघ असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. (वार्ताहर)