छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी एप्रिलपर्यंत येईल, असा दावा करण्यात येतोय. त्यातच सोमवारी रात्री महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ढोरकीन गावाजवळ २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी घेतली. ही टेस्ट यशस्वी झाली. अडीच किलोमीटर जलवाहिनीच्या चाचणीसाठी तब्बल दोन कोटी लिटर पाण्याचा वापर करण्यात आला.
२७४० कोटी रुपये खर्च करून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे जवळपास ८५ टक्के काम पूर्ण झाले. एप्रिलमध्ये पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी शहरात येईल, असा दावा वारंवार करण्यात येतोय. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे फक्त ७८ दिवसांचा कालावधी शिल्लक असून, एवढ्या कमी वेळेत पाणी आणणे शक्य आहे का? हा मोठा प्रश्न आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतचे अंतर ३९ किमी आहे. ३७ किमी जलवाहिनी टाकली. दोन किमी काम बाकी आहे. काही ठिकाणी जलवाहिनीची हायड्रोलिक टेस्ट घेणे शक्य नाही. त्यामुळे रेडिओग्राफी टेस्ट घेण्यात आली. हायड्रोलिक टेस्ट घेताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील, कनिष्ठ अभियंता बिलवाडे, जीव्हीपीआरचे महाव्यवस्थापक महेंद्र गुगुलोथू, अभियंता खलील अहेमद उपस्थित होते.
२.५ किमी अंतरसोमवारी रात्री ढोरकीन गावाजवळ अडीच किमी अंतरात जलवाहिनीत दोन कोटी लिटर पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पाण्याला प्रेशर दिले. जलवाहिनीतील प्रेशर जेवढे पाहिजे तेवढे मिळाले. ही टेस्ट यशस्वी झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. एक किलोमीटर अंतरावर हायड्रोलिक टेस्टसाठी ७० लाख लिटर पाणी लागते. अडीच किलोमीटर अंतराच्या जलवाहिनीवरील हायड्रोलिक चाचणीसाठी दोन कोटी लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. पुढील काही दिवसांत बिडकीन, चितेगाव या ठिकाणी हायड्रोलिक टेस्ट घेतली जाणार आहे.