गोळ्या भरलेल्या गावठी पिस्तुलासह दोन गुन्हेगारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:04 IST2021-04-04T04:04:17+5:302021-04-04T04:04:17+5:30
पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाची मिटमिटा येथे कामगिरी औरंगाबाद : गावठी कट्टा, त्यात तीन काडतुसे आणि अन्य ५ वापरलेल्या ...

गोळ्या भरलेल्या गावठी पिस्तुलासह दोन गुन्हेगारांना अटक
पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाची मिटमिटा येथे कामगिरी
औरंगाबाद : गावठी कट्टा, त्यात तीन काडतुसे आणि अन्य ५ वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्यांसह निघालेल्या दोन गुन्हेगारांना पोलीस आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी मिटमिटा येथे अटक केली.
किरण हरिश्चंद्र गंगावणे (रा. अंसार कॉलनी, पडेगाव) आणि योगेश बाबूराव साबळे (२७, मिटमिटा), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. किरण गंगावणे हा प्लॉटिंग खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे असल्याची माहिती खबऱ्याने राहुल रोडे यांना दिली. तेव्हापासून रोडे आणि त्यांचे सहकारी आरोपीच्या मागावर होते. आरोपी गंगावणे सायंकाळी गावठी कट्ट्यासह घराबाहेर पडल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रोडे, कर्मचारी सय्यद शकील, इमरान पठाण, मनोज विखणकर, विनोद पवार आणि आडे यांनी सापळा रचला. मिटमिटा येथील शाळेजवळ आरोपी गंगावणे साथीदार आरोपी साबळेसह येताना दिसताच पोलिसांनी चोहोबाजूंनी घेरून त्यांना जागीच पकडले. सर्वप्रथम त्याच्या कमरेला खोचलेले पिस्तूल पोलिसांनी हिसकावून घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ तीन बुलेट (जिवंत काडतुसे) आणि वापरलेल्या बुलेटच्या पाच रिकाम्या पुंगळ्या (केस) आढळून आल्या. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
----------------------------चौकट
आरोपी गंगावणे याने डिसेंबर महिन्यात हे पिस्तूल खरेदी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. हे पिस्तूल खरेदी केल्यावर त्याने
गोळीबार करण्याचा सराव केल्याचे समोर आले. त्याने कधी आणि कुठे गोळीबार केला याचा तपास पोलिसांनी सुरू केला. गंगावणेविरुद्ध यापूर्वी एका जणावर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा नोंद आहे. त्याने कुणाला मारायला हे पिस्तूल आणले अथवा धमकावण्यासाठी याचा तपास पोलीस करीत आहेत.