दोन महिन्यांत दोन दरडी कोसळल्या
By Admin | Updated: August 17, 2014 01:42 IST2014-08-17T01:14:35+5:302014-08-17T01:42:38+5:30
श्यामकुमार पुरे, अजिंठा अजिंठा लेणीत मागील दोन महिन्यांत मुरुम व दगडांच्या दोन दरडी कोसळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दोन महिन्यांत दोन दरडी कोसळल्या
श्यामकुमार पुरे, अजिंठा
अजिंठा लेणीत मागील दोन महिन्यांत मुरुम व दगडांच्या दोन दरडी कोसळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लेणी क्र. २ व २७समोर रात्रीच्या वेळी या छोट्या दरडी कोसळल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही. लेणीच्या माथ्यावरील ९० ठिकाणचे दगड धोकादायक असल्याचा अहवाल तीन वर्षांपूर्वी देऊनही पुरातत्व विभागाने कुठलीच दखल घेतली नाही. या घटनांनंतर आता दगड काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
अजिंठा येथे एकूण २६ लेण्या असून त्यांच्या माथ्यावर मोठे डोंगर आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या डोंगराची माती मोकळी होते. कधी मोठे तर कधी लहान लहान दगड, दरड, लेणीसमोर कोसळतात. हे प्रकार गेल्या तीन वर्षांपासून वाढले
आहेत.
१९९८ पासून ते सन २०१४ पर्यंत (१६ वर्षांत) भारतीय रेल्वे रिसर्च संस्था दिल्ली, सेंटर मायनिंग रिसर्च संस्था दिल्ली, जीएसआय सर्व्हे आॅफ इंडिया, भारतीय भूगर्भतज्ज्ञ नागपूर या संस्थांनी केलेल्या पाहणीत लेणीच्या माथ्यावरील ९० ठिकाणचे बोल्डर (दगड) धोकादायक बनल्याचे स्पष्ट झाले आहे. नैसर्गिक आपत्ती, भूकंप, मोठ्या पावसामुळे हे दगड कधीही पडू शकतात म्हणून ते काढून टाकावे किंवा लेणीच्या डोंगर माथ्यावर स्टीलनेट जाळी लावावी, अशा सूचना (अहवाल) २०१० मध्येच देण्यात आल्या होत्या. मात्र, पुरातत्व विभागाने आतापर्यंत याकडे गांभिर्याने पाहिले नाही.
मुख्य लेणीतील चार खांब बदलणार
अजिंठा लेणीतील गुफा नं. १० सर्वांत महत्त्वाची आहे. सर्व प्रथम याच लेणीचा शोध लागला होता. या लेणीचे सर्वच १० खांब ठिसूळ झाले आहेत. येत्या चार महिन्यांत ट्रायल बेसवर ही ४ खांबे बदलण्यात येणार आहेत.
पर्यटकांनी डोंगराच्या कडेने चालावे
पर्यटकांनी डोंगराच्या कडेकडून चालावे जेणेकरून अशी घटना घडली तर कुणी पर्यटक जखमी होणार नाही. यासाठी पुरातत्व विभागाने जागोजागी बॅरिकेटस् लावले असल्याची माहिती डी.एस. दानवे यांनी दिली.
दगड काढण्यासाठी प्रस्ताव सादर
लवकरच टेंडर काढून धोकादायक दगड काढून घेण्यात येतील. काही ठिकाणी स्टीलची जाळी लावण्यासाठी आम्ही मागील आठवड्यात दिल्ली येथील भारतीय पुरातत्व विभागाकडे प्रस्ताव सादर केला असल्याचे अजिंठा लेणीमधील भारतीय पुरातत्व विभागाचे संरक्षक सहायक डी. एस. दानवे यांनी सांगितले.