दोन नगरसेवक भाजपामध्ये; सेनेसमोर नवे आव्हान
By Admin | Updated: October 6, 2014 00:43 IST2014-10-06T00:29:24+5:302014-10-06T00:43:52+5:30
औरंगाबाद : दोन नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेसमोर नव्याने आव्हान निर्माण झाले आहे.

दोन नगरसेवक भाजपामध्ये; सेनेसमोर नवे आव्हान
औरंगाबाद : दोन नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेसमोर नव्याने आव्हान निर्माण झाले आहे. भाजपाचा हा डाव उलटविण्यासाठी सेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल कोणती खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
गुलमंडीच्या नगरसेविका प्रीती तोतला, धावणी मोहल्ल्याचे जगदीश सिद्ध यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. या दोघांचेही वॉर्ड मध्य मतदारसंघात येतात. हे दोन्ही नगरसेवक शिवसेनेतून भाजपामध्ये गेलेले आणि मध्यची उमेदवारी मिळविलेले किशनचंद तनवाणी यांचे समर्थक आहेत. यामुळे प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी हा संघर्ष आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे. तनवाणी यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतल्यानंतर जगदीश सिद्ध आणि प्रीती तोतला हेदेखील तनवाणी यांच्यासोबत जातील, असे गृहीत धरण्यात आले होते. त्याप्रमाणेच घडले. प्रीती तोतला यांनी काही दिवस प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचार कार्यालयांत हजेरीही लावली होती. जगदीश सिद्ध हे तनवाणी यांचे कट्टर समर्थक मानले जातात. महापालिकेच्या राजकारणात खा. चंद्रकांत खैरे आणि प्रदीप जैस्वाल यांनी आपली कायम कोंडी केली, असा सिद्ध यांचा समज आहे. लोकसभा निवडणुकीआधी झालेल्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी हक्क असतानाही डावलले गेल्याची सिद्ध यांची भावना होती. त्यामुळे स्थानिक सेना नेतृत्वावर ते नाराज होते. सिद्ध हे धावणी मोहल्ल्यातून सातत्याने निवडून आले आहेत. शिवसेनेने तनवाणी यांना गद्दार असे संबोधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तनवाणी यांनीही शिवसेनेच्या विरोधात आघाडी उघडल्याचे चित्र आहे. त्यामुळे सिद्ध आणि तोतला यांना भाजपामध्ये घेऊन जैस्वाल यांना शह देण्याचा प्रयत्न तनवाणी यांनी केल्याचे दिसत आहे.
सिद्ध यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नगरसेवकपदाच्या तीन टर्मपासून मला मनपात पद दिले नाही. नवीन लोकांंना पदे दिली. शिवसैनिक नसलेल्यांनाही तिकीट देऊन ते निवडून आल्यानंतर त्यांनाही पदे वाटली गेली. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने आपल्यावर सतत अन्यायच केला. लोकसभा निवडणुकीत माझ्या वॉर्डात शिवसेनेच्या उमेदवाराला तीन हजारांची आघाडी दिली तरीही मी काम केले नसल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे नाईलाजास्तव पक्ष सोडावा लागला.