घरफोडी करणाऱ्या दोघांना पकडले
By Admin | Updated: July 14, 2014 01:04 IST2014-07-14T00:42:23+5:302014-07-14T01:04:28+5:30
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात तीन आठवड्यांपूर्वी घरफोडी करून लाखाचा ऐवज लांबविणाऱ्या दोघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पकडले.

घरफोडी करणाऱ्या दोघांना पकडले
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात तीन आठवड्यांपूर्वी घरफोडी करून लाखाचा ऐवज लांबविणाऱ्या दोघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून ६१ हजार रुपयांचे चोरी केलेले दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
८ जुलै रोजी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार पांडे, सहायक फौजदार सागरसिंग राजपूत, पोकॉ. अनिल पवार, परमेश्वर पायगव्हाणे, विलास वैष्णव, चालक म्हस्के मुंबई- नागपूर हायवेवर गस्तीवर असताना त्यांनी दोन संशयित तरुणांना ठाण्यात आणून विचारपूस केली. त्यांची नावे जुबेरखान शब्बीरखान (३१, रा. परळी, जि. बीड, ह. मु. साजापूर) व गौतमकुमारसिंग जितेश्वर प्रसादसिंग (रा. बिहार, ह. मु. साजापूर) अशी आहेत.
चोरीचा ऐवज हस्तगत
चोरट्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी तीन आठवड्यांपूर्वी सिडको वाळूज महानगरातील सुनील महादेव माणके (रा. सिडको वाळूज महानगर-१) यांच्या घरी २० जूनच्या मध्यरात्री चोरी केल्याचे कबूल केले.
त्यांनी तेथून रोख ३० हजार रुपये, साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे गंठन, २ हजार रुपयांची साखळी नेली होती. त्यांच्या ताब्यातून ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन, पायातील चेन व साखळी असा ६१ हजार ४१४ रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. चोरी करण्यासाठी आरोपींनी वापरलेली दुचाकी (क्रमांक एम.एच.-२४, बी.- ४६२८) जप्त केली आहे. ही दुचाकीही चोरीची असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.