रिव्हॉल्व्हरसह दोघांना अटक
By Admin | Updated: March 14, 2016 00:51 IST2016-03-14T00:50:05+5:302016-03-14T00:51:35+5:30
औरंगाबाद : नाशिकच्या मित्राकडून आणलेले रिव्हॉल्व्हर विक्री करण्यासाठी औरंगाबादेत आलेल्या दोघांना मुकुंदवाडी ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी) तीन जिवंत काडतुसांसह अटक केली.

रिव्हॉल्व्हरसह दोघांना अटक
औरंगाबाद : नाशिकच्या मित्राकडून आणलेले रिव्हॉल्व्हर विक्री करण्यासाठी औरंगाबादेत आलेल्या दोघांना मुकुंदवाडी ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी) तीन जिवंत काडतुसांसह अटक केली. ही कारवाई रविवारी रेल्वे गेट क्र. ५६ च्या जवळ विमानतळाच्या भिंतीलगत करण्यात आली.
संजय ऊर्फ पप्पू अण्णासाहेब पवार (२२, रा. रेल्वेगेट, मुकुंदनगर) व शिवशंकर सखाराम शिंदे (२८, रा. पवननगर, रांजणगाव) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांनी सांगितले की, दोन तरुण रिव्हॉल्व्हर विकण्यासाठी विमानतळ परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मुकुंदवाडी ठाण्याचे हवालदार विष्णू हगवणे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे फौजदार कल्याण शेळके, हगवणे, बन विमानतळ परिसरात गेले. तेथील हिवाळे प्लॉटिंग सेंटरचा गाळा असलेल्या आडोशाला रेल्वेगेट क्र. ५६ येथे दोघे संशयित दिसले. पोलीस पथकाने त्यांना पकडून चौकशी केली व झडती घेतली. त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर व तीन जिवंत काडतुसे सापडली. अधिक चौकशीत त्यांनी ही रिव्हॉल्व्हर नाशिक येथील मित्र गजानन भगवान पवार याच्याकडून आणल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी रिव्हॉल्व्हर व तीन काडतुसे जप्त करून दोघांनाही अटक केली आहे. संशयित आरोपींवर मुकुंदवाडी ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.