सेनेचे दोन सदस्य गायब
By Admin | Updated: March 20, 2017 23:49 IST2017-03-20T23:48:55+5:302017-03-20T23:49:34+5:30
उस्मानाबाद / उमरगा : जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी एकाही प्रमुख पक्षाकडे बहुमत नाही़

सेनेचे दोन सदस्य गायब
उस्मानाबाद / उमरगा : जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी एकाही प्रमुख पक्षाकडे बहुमत नाही़ सत्तेसाठी युती-आघाडीबाबत बैठकांचे फड रंगले असून, नेतेमंडळींचा कस लागला आहे़ २१ मार्च रोजी अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडी होत असून, कोणता पक्ष सत्तेत येणार ? याबाबत कमालीची उत्सुकता आहे़ याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उमरगा तालुक्यातील दोन जिल्हा परिषद सदस्य गायब झाले आहेत़ विशेष म्हणजे शिवसेनेचे उपनेते तथा आ़ प्रा़ तानाजी सावंत यांनी या दोन्ही सदस्यांना फूस लावून अपहरण केल्याचा आरोप उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे यांनी केला आहे़ याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्यात आली असून, सदस्यांना परत आले नाहीत तर पोलिसांच्या विरोधातच २१ मार्च रोजी उमरगा येथे रास्तारोको व जिल्हा बंद करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे़
५५ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला २६, काँग्रेस पक्षाला १३, शिवसेनेला ११, भाजपाला ४ तर भारतीय परिवर्तन सेनेला एका जागेवर यश मिळाले आहे़ बहुमतासाठी असलेला जादुई २८ चा आकडा गाठण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत़ सर्वाधिक जागा असलेल्या राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना, भाजपाच्या नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांनी आघाडी-युतीच्या बैठकांसह सदस्य फोडाफोडीचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे़ आजवर अनेक बैठका झाल्या असल्या तरी कोणत्याच पक्षाकडून आपण सत्ता स्थापन करू असा दावा करण्यात आलेला नाही़ त्यामुळे सत्तेत कोणता पक्ष बसणार ? सर्वाधिक संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीला यावेळीही इतर पक्ष सत्तेतून बाहेर ठेवणार का ? भाजपा कोणासोबत जाणार ? की एखाद्या पक्षाचे सदस्य विरोधकांशी हात मिळवणी करणार ? यासह इतर अनेक प्रश्नांचा ‘सस्पेंस’ कायम आहे़
विशेष म्हणजे २१ मार्च रोजी सकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडी होत आहेत़ या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उमरगा तालुक्यातील ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या कवठा गटातून विजयी झालेले जिल्हा परिषद सदस्य शेखर गोविंदराव घंटे व मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित असलेल्या कानेगाव गटातून विजयी झालेल्या सदस्या चंद्रकला भिमराव नारायणकर हे दोन सदस्य बेपत्ता आहेत़ या दोन्ही सदस्यांना शिवसेनेचे उपनेते आ़ प्रा़ तानाजी सावंत यांनी फूस लावून त्यांचे अपहरण केल्याचा आरोप सेनेचेच उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे यांनी केला आहे़ याबाबत उमरगा पोलीस ठाण्यामार्फत पोलीस अधीक्षकांकडे २० मार्च रोजी तक्रार करण्यात आली आहे़ बेपत्ता असलेल्या दोन्ही सदस्यांच्या जिवाला धोका असून, त्यांना तात्काळ संरक्षण देणे गरजेचे आहे़ हे सदस्य सोमवारी सायंकाळपर्यंत परत आले नाही तर पोलिसांचा निषेध म्हणून २१ मार्च रोजी शिवसेनेच्या वतीने उमरगा शहरातील हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात रास्तारोको आंदोलन व शिवसेनेच्या वतीने जिल्हा बंद करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे़ यापूर्वीही शिवसेनेतील गटबाजी वेळोवेळी चव्हाट्यावर आली असून, एकमेकांचे पुतळे जाळण्याचे प्रकारही झाले होते़ आता थेट उपनेत्यांनीच सदस्यांचे अपहरण केल्याचा आरोप तालुकाप्रमुखांनी केल्याने पक्षातच मोठी खळबळ उडाली आहे़ दरम्यान, आ़ प्रा़ तानाजी सावंत यांच्याविरूध्द तक्रार देणारे तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे यांनी सोमवारी सायंकाळी स्वत:च दिलेली तक्रार मागे घेतली़ शहापुरे यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षश्रेष्ठींनी मंगळवारी दुपारपर्यंत सदस्य मिळतील, असे आश्वासन दिल्याने आपण पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेतल्याचे ते म्हणाले़ (प्रतिनिधी)