गोळीबारप्रकरणी २ आरोपी अटकेत
By Admin | Updated: June 28, 2014 01:20 IST2014-06-28T00:56:49+5:302014-06-28T01:20:24+5:30
वाळूज महानगर : पंढरपुरात दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन्ही गटांतील वाद मिटविण्यासाठी मध्यस्ती करणाऱ्या युवकावर गोळीबार केल्याप्रकरणी

गोळीबारप्रकरणी २ आरोपी अटकेत
वाळूज महानगर : पंढरपुरात दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन्ही गटांतील वाद मिटविण्यासाठी मध्यस्ती करणाऱ्या युवकावर गोळीबार केल्याप्रकरणी आज सचिन पोपट राऊत व बबन रंगनाथ साबळे (दोघेही रा. वळदगाव) या आरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात सहभागी ८ आरोपी फरार असून त्यांचा शोध एमआयडीसी वाळूज पोलीस घेत आहेत.
काल २६ जूनला भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या शेख निसार शेख शब्बीर (२८, रा. फुलेनगर, पंढरपूर) यांच्या पोटात गोळी झाडून तसेच हवेत गोळीबार करून आरोपी फरार झाले होते. या गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेख निसार यांस उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शेख निसार याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या गोळीबारप्रकरणी शेख तालेब याच्या फिर्यादीवरून आरोपी अण्णा मनोहर साबळे, ज्ञानेश्वर काशीनाथ साबळे, बबन रंगनाथ साबळे, सचिन पोपट राऊत, नामदेव शिंदे, पमू दगडू बुट्टे, विलू बाबासाहेब झळके (सर्व रा. वळदगाव, ता.जि. औरंगाबाद), तसेच गोळीबार करणारा अनोळखी युवक व त्यांच्या दोघा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरोपी लपले वळदगावात
या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी धरपकड मोहीम राबविली होती. मारहाण करणारे आरोपी वळदगावात लपून बसल्याची माहिती मिळताच आज २७ जूनला सकाळी पोलिसांनी छापा मारून आरोपी सचिन पोपट राऊत व बबन रंगनाथ साबळे (दोघेही रा. वळदगाव) यांना अटक केली आहे. उर्वरित ८ आरोपींचा शोध एमआयडीसी वाळूज पोलिसांकडून सुरू आहे.