छत्रपती संभाजीनगर : मुंबई, पुणे, कोकण, नागपूरमध्ये ११ हजार गुंतवणूकदारांना अशक्यप्राय परताव्याचे आमिष दाखवून १२०० कोटींचा टीडब्ल्यूजे कंपनीच्या घोटाळ्याचे लोण जिल्ह्यातही पसरले आहे. शहरातील ३४ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर समीर सुभाष नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर, अमित विश्वनाथ बालम, किरण कुंडले या टोळीने जवळपास १५० पेक्षा अधिक गुंतवणूकदारांना कोट्यवधींना गंडा घातला. बुधवारी या प्रकरणात चौघांसह कंपनीच्या २४ जणांच्या टोळीवर एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रा.लि. (ट्रेड विथ जॅझ) या कंपनीमार्फत शेअर मार्केट, आयटी प्रोजेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प तसेच सरकारी कंत्राटांमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा ३ ते ५ टक्के निश्चित परतावा मिळेल, असे आमिष गुंतवणूकदारांना दाखविण्यात येत होते. अवघ्या दोन ते तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या कंपनीने अल्पावधीत गुंतवलेली रक्कम दुप्पट करून देण्याचे आश्वासन देत विविध गुंतवणूक योजना राबवल्या. कंपनीच्या प्रतिनिधींमार्फत विविध शहरांत सेमिनार, प्रेझेंटेशन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांशी संपर्क साधून त्यांच्या नावावर करारनामा करून रक्कम स्वीकारण्यात येत होती. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून कोट्यवधी रुपये आरोपींनी हडपले.
३८० पेक्षा अधिक गुंतवणूकदारशहरातील संतोष शेवाळे (३९, रा. मिटमिटा) यांचा मित्र दयानंद कदम हा टीडब्ल्यूजे कंपनीच्या शहरातील शाखेत नोकरीला होता. प्रोझोन मॉलजवळील गोल्डन सिटी सेेंटर येथे कंपनीने आलिशान कार्यालय थाटले होते. मार्च, २०२४ मध्ये समीर व नेहा नार्वेकर यांच्यासोबत त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांच्या प्रलोभनांना बळी पडून शेवाळे यांनी २९ लाखांची गुंतवणूक केली. यात त्यांना काही परतावा मिळालाही. फेब्रुवारी, २०२५ नंतर मात्र तो बंद झाला. त्यांच्यासह प्राथमिक स्तरावर ३८ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे ४ कोटी ३३ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार केली. प्रत्यक्षात शहर व जिल्ह्यात असे ३८० पेक्षा अधिक गुंतवणूकदार १० कोटींपेक्षा अधिक रक्कम या घोटाळ्यात गमावून बसल्याचे पोलिसांनी सांगितले.
असे दाखवले आमिष- १० लाखांपर्यंतच्या गुंतवणूकीवर प्रतिमहा ३ टक्के परतावा- १० लाखांच्या वर ४ टक्के परतावा- २५ लाखांच्या वर गुंतवणूक केल्यास ५ टक्के परतावा- गुंतवणूकदारांना मिळालेल्या नफ्यावर २ टक्के टीडीएसही कपात होईल, असे सांगण्यात आले. यासाठी करार केला गेला.
२० शाखा, १५ हून अधिक कंपन्यानार्वेकर दाम्पत्य आणि अमित बालमने मिळून राज्यभरात ट्रेड विथ जॅझ, टीडब्ल्यूजे इन्फ्रास्ट्रक्चर, टीडब्ल्यूजे बिझनेस कन्सल्टिंग, टीडब्ल्यूजे इव्हेंट, टीडब्ल्यूजे आयटी सोल्युशन, टीडब्ल्यूजे मीडिया अशा १५ पेक्षा अधिक कंपन्या स्थापन केल्या होत्या. राज्यभरात २० ठिकाणी कार्यालये थाटून त्यांनी कोट्यवधींची माया जमवली.
१६ ठिकाणी गुन्हे, २९ जानेवारीला अटकसमीर नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर, अमित बालम, किरण कुंडले यांच्यासह २४ जणांवर राज्यात पुणे, चिपळूण, यवतमाळ, नागपूर, रत्नागिरीसह एकूण १६ जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल होताच नार्वेकर, बालम गुजरातमध्ये पळून गेले होते. ठाणे पोलिसांनी त्यांना २९ जानेवारीला अटक केली.
अधिकारी, नेते, पोलिसांचाही समावेशसमीर व नेहा नार्वेकरने सर्वसामान्यांसोबत वरिष्ठ शासकीय अधिकारी, राजकीय नेते, पोलिस अधिकारी, अंमलदारांनाही गंडा घातला. पुणे व रत्नागिरी जिल्ह्यांत त्यांनी जवळपास १६०० पोलिसांना चुना लावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक कलाकारांनी त्याच्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती.
ताब्यात घेणारनार्वेकर दाम्पत्य व बालम सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. लवकरच त्यांच्या ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल. यात पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांनी तक्रारीसाठी पुढे यावे.- संभाजी पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा
Web Summary : TWJ company lured investors with high returns in Sambhajinagar. Over 380 investors lost ₹10 crore. The scam involved false promises, seminars, and initial payouts to gain trust before defrauding investors. Police are investigating the 24-member gang involved.
Web Summary : टीडब्ल्यूजे कंपनी ने संभाजीनगर में निवेशकों को उच्च रिटर्न का लालच दिया। 380 से अधिक निवेशकों को ₹10 करोड़ का नुकसान हुआ। घोटाले में झूठे वादे, सेमिनार और निवेशकों को धोखा देने से पहले विश्वास हासिल करने के लिए प्रारंभिक भुगतान शामिल थे। पुलिस 24 सदस्यीय गिरोह की जांच कर रही है।