वीस गावांना होतो दूषित पाणीपुरवठा
By Admin | Updated: July 17, 2017 00:45 IST2017-07-17T00:43:29+5:302017-07-17T00:45:53+5:30
मंठा : तालुक्यातील वीस गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा अहवाल उपविभागीय प्रयोगशाळेने दिला आहे.

वीस गावांना होतो दूषित पाणीपुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : तालुक्यातील वीस गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा अहवाल उपविभागीय प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये कॉलरा, टायफॉईड, गॅस्ट्रोची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढली आहे.
मंठा शहरासह तालुक्यातील हेलस, टोकवाडी, अंभोरा शेळके, आरडाखाडी, रानमाळा, उस्वद, शिवनगिरी, विडोळी आदी गावांमधील सार्वजनिक स्रोतांमधील पाण्याचे नमुने दुषित असल्याचा अहवाल मंठा उपविभागीय प्रयोगशाळेने दिल्याचे आरोग्य सहायक सरकटे यांनी सांगितले. दुषित पाण्यांमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये साथरोगाचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याने गॅस्ट्रोची लागण झालेले अनेक रुग्ण उपचारासाठी खाजगी दवाखान्यात जात आहेत. नागरिकांनी आपल्या कुपनलिका, विहिरीच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून घ्यावे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. दरम्यान, सार्वजनिक विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्याची मागणी विडोळीचे सरपंच रामकिशन अवचार यांनी केली. तर अनेक गावांमध्ये पाइपलाइन गळतीमुळे नळांना पिवळे पाणी येत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची गरज असल्याचे पंचायत समिती सभापती स्मिता मस्के यांनी सांगितले.