उस्मानाबाद : जिल्ह्यातील १७९ पैकी २२ प्रकल्प कोरडेठाक असून, नोव्हेंबर महिन्यापासूनच जिल्ह्यातील अनेक गावांना टंचाईच्या झळा जाणवत आहेत. सद्यस्थितीत ३७ गावांमध्ये ६० जलस्त्रोतांचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय जिल्ह्यात गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे प्रकल्पांची स्थिती गंभीर आहे. जिल्ह्यात एक मोठा, १५ मध्यम तर १६४ लघू प्रकल्प आहेत़ यात सिना-कोळेगाव या मोठ्या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा नाही़ पंधरा मध्यम प्रकल्पांपैकी दोन प्रकल्पात ५१ ते ७५ टक्के, तीन प्रकल्पात २६ ते ५० टक्के, पाच प्रकल्पात २५ टक्के पेक्षा कमी तर उर्वरित प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. याशिवाय एक प्रकल्प कोरडाठाक आहे. तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात १६.७२ टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. याशिवाय जिल्ह्यातील १६४ लघु प्रकल्पामध्ये २७.४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यातील पाच प्रकल्पात शंभर टक्के पाणी साठा, सहा प्रकल्पात ७५ टक्के, २५ प्रकल्पामध्ये ५१ ते ७५ टक्के दरम्यान पाणी साठा शिल्लक आहे. तसेच पंचवीस प्रकल्पात २६ ते ५० टक्के पाणीसाठा, ३२ प्रकल्पामध्ये २५ टक्के पेक्षा कमी पाणी, ५० लघु प्रकल्पातील साठा ज्योत्याखाली आहे. तर २१ प्रकल्प कोरडे आहेत. प्रकल्पाच्या या स्थितीमुळे डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात भूम तालुक्यामध्ये २, लोहारा तालुक्यात ९ आणि उस्मानाबाद तालुक्यात २६ गावांना जलस्त्रोतांचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक ३९, लोहारा तालुक्यात १९ तर भूम तालुक्यासाठी दोन जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. एकूण अधिग्रहीत जलस्त्रोतांची संख्या ६० वर आली आहे. येणाऱ्या काही दिवसांत प्रकल्पांतील पाणीसाठा आणखी कमी होऊन अनेक गावांना टँकरसह अधिग्रहणाची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(वार्ताहर)४कळंब तालुक्यातील रायगव्हाणसह उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी, कोल्हेगाव, वडाळा, करजखेडा, घुगी, येवती, टाकळी, जागजी, आळणी, बेंबळी, गोपाळवाडी, पाडोळी, बोरगाव, धुत्ता, कोंड, उमरगा तालुक्यातील सुपतगाव, पेठसांगवी, सरोडी, कळंब तालुक्यातील शिराढोण, ढोराळा हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. ४टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर संबंधित टँकरच्या माध्यमातून नेमक्या किती फेऱ्या होतात, यावरही आता ‘जीपीएस’ यंत्रणेच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे टँकरच्या फेऱ्यांमध्ये पारदर्शकता येण्यास मदत होईल. विशेष म्हणजे, एखाद्या टँकरने कोणत्या गावाला किती फेऱ्या मारल्या, हे देखील जिल्हा प्रशासनाला मुख्यालयी बसून पाहता येणार आहे. टंचाई निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. एखाद्या गावाने प्रस्ताव दाखल केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी युध्दपातळीवर संबंधित प्रस्तावाच्या अनुषंगाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. भविष्यात टंचाईची परिस्थिती अधिक तीव्र रूप धारण करणार असल्याने अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. चाटे यांनी केले आहे. ४दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून, अधिग्रहणासोबतच टँकरच्या संख्येतही भर पडत आहे. भूम तालुक्यातील वालवड येथे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे उस्मानाबाद तालुक्यातील कावळेवाडी आणि वाणेवाडी येथे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन टँकर सुरू आहेत.
बावीस प्रकल्प कोरडेठाक
By admin | Updated: December 5, 2014 00:51 IST