डझनभर लाचखोर अडीच महिन्यात जेरबंद
By Admin | Updated: August 18, 2014 01:00 IST2014-08-18T00:56:05+5:302014-08-18T01:00:16+5:30
उस्मानाबाद : लाचलूचपत प्रतिबंधक पथकाच्या पोलीस उपाधीक्षक म्हणून पदभार घेतल्यानंतर अश्विनी भोसले यांनी लाचखोरांविरूध्द कारवाईचे सत्र सुरू केले आहे़

डझनभर लाचखोर अडीच महिन्यात जेरबंद
उस्मानाबाद : लाचलूचपत प्रतिबंधक पथकाच्या पोलीस उपाधीक्षक म्हणून पदभार घेतल्यानंतर अश्विनी भोसले यांनी लाचखोरांविरूध्द कारवाईचे सत्र सुरू केले आहे़ अडीच महिन्याच्या कालावधीतच नऊ सापळे रचून ११ जणांना रंगेहाथ जेरबंद केले आहे़ तर एका प्रकरणात वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी असे बडे मासेही भोसले यांच्या सापळ्यात अडकले आहेत़
नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थीनीस जातीचे प्रमाणपत्र व बारावीची सनद देण्यासाठी दहा हजाराची लाच घेताना ७ जून रोजी संस्थापक मनोहर बदामे व ट्यूटर निलम शेख यांना जेरबंद करण्यात आले़ लाचखोरांविरूध्द भोसले यांच्या प्रभारी कार्यकाळात केलेला हा पहिला यशस्वी सापळा होता़ त्यानंतर २७ जून रोजी परंडा तालुक्यातील सिरसाव तलाठी सज्जाचे तलाठी मोहन बसवेश्वर स्वामी यांना गारपीट अनुदानासाठी अज्ञान पालकाची नोंद कमी करून सातबारा देण्यासाठी शेतकऱ्याकडून ४०० रूपयांची लाच घेताना रंगेहात जेरबंद केले़ तत्पूर्वी १० जून रोजी तडवळा (ता़तुळजापूर) सज्जाच्या तलाठी सुकेशिनी कांबळे यांनी शेतजमिनीचा फेरफार मंजूर करून सातबारा देण्यासाठी १५०० रूपयांच्या लाचेची मागणी एसीबीने लावलेल्या सापळ्यादरम्यान पंचासमक्ष केली होती़ या प्रकरणी वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात आला होता़ वरिष्ठांच्या सूचननंतर ३ जुलै रोजी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ १२ आॅगस्ट रोजी वाशी तालुक्यातील इजोरा येथील ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचे बील काढण्यासाठी ३० हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून २० हजार रूपये स्विकारणाऱ्या सरपंच छाया गोकूळ चव्हाण व रोजगार सेवक नवनाथ सुनिल कुंभार यांना जेरबंद केले़ १६ आॅगस्ट रोजी तक्रारदाराने घराच्या जागेत घेतलेल्या बोअरची ग्रामपंचायतीच्या आठ अ ला नोंद करून तसा आठ अ देण्यासाठी २५० रूपयांची लाच घेताना समुद्रवाणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बालाजी वाघमारे यांना जेरबंद करण्यात आले़
तर दुसऱ्याच दिवशी १७ आॅगस्ट रोजी जागजीचे मंडळ अधिकारी पोपट सोमनाथ मोराळे यांना इर्ला येथील शेतकऱ्याच्या शेतजमिनीची लागलेल्या निकालाप्रमाणे सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी एक लाख रूपये लाचेची मागणी करून खासगी इसम रामेश्वर सुखदेव काकडे याच्या मार्फत स्विकारताना ९० हजार रूपयांची लाच स्विकारताना जेरबंद करण्यात आले़ (प्रतिनिधी)