अडीच लाखांचा जर्दा जप्त
By Admin | Updated: September 16, 2014 01:32 IST2014-09-16T00:45:50+5:302014-09-16T01:32:13+5:30
लातूर : अन्न व औषधी प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास गंजगोलाई परिसरातील एस. पान मटेरियल येथे छापा टाकला.

अडीच लाखांचा जर्दा जप्त
लातूर : अन्न व औषधी प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास गंजगोलाई परिसरातील एस. पान मटेरियल येथे छापा टाकला. या छाप्यात अडीच लाखांच्या आसपास सुगंधी जर्दा जप्त करण्यात आला आहे.
गंजगोलाई परिसरातील एस. पान मटेरियल येथे बंदी असलेल्या सुगंधी जर्द्याची होलसेल विक्री होत असल्याची गुप्त माहिती अन्न व औषधी प्रशासन तसेच पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे संयुक्त पथकाने सोमवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास एस. पान मटेरियलवर छापा टाकला. या पान मटेरियलचे नऊ शटर उघडण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात सुगंधी सुपारी, सुगंधी जर्दा (बाबा, रत्ना) अशी सुगंधीजन्य तंबाखू असल्याचे निदर्शनास आले. सायंकाळी ५.३० वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत या सुगंधी जर्द्याची मोजदात अन्न व औषधी प्रशासनाकडून सुरू होती.
अंदाजे साडेतीन लाखांचा हा जर्दा असावा, असा प्राथमिक अंदाज अन्न व औषधी प्रशासन तसेच पोलिसांनी व्यक्त केला आहे. छाप्याच्या वेळी एस. पान मटेरियल येथे हणमंत शिवराज धनुरे (रा. मोतीनगर, वय ३०) हा नोकर तेथे आढळला. तर या एजन्सीचे मालक राजकुमार चंद्रशेखर काश्यपनूर असल्याचे अन्न व औषधी प्रशासनाचे निरीक्षक दयानंद पाटील यांनी सांगितले. या दोघांवरही गांधी चौक पोलिसात अन्न व औषधी प्रशासनाच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
कारवाई पथकात अन्न सुरक्षा अधिकारी दयानंद पाटील त्रिंबक काकडे, बा.मा. ठाकूर, नमुना सहाय्यक बी.आर. राठोड, पोलिस कॉन्स्टेबल जगताप यांचा समावेश होता. बंदी असलेल्या सुगंधी जर्द्याची खरेदी व विक्री करू नये, असे निर्देश दिले असतानाही मोठ्या प्रमाणात सुगंधी जर्द्याचा साठा आढळल्याचे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)