सव्वा लाख कुटुंब उघड्यावर !
By Admin | Updated: August 8, 2016 00:41 IST2016-08-08T00:34:27+5:302016-08-08T00:41:47+5:30
आशपाक पठाण , लातूर शौचालय बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वारंवार जनजागृती करूनही लातूर जिल्ह्यात त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ग्रामीण भागात अजूनही

सव्वा लाख कुटुंब उघड्यावर !
आशपाक पठाण , लातूर
शौचालय बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वारंवार जनजागृती करूनही लातूर जिल्ह्यात त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ग्रामीण भागात अजूनही लोकांची मानसिकता बदलली नसल्याने जिल्हाभरात जवळपास सव्वा लाख कुटुंब उघड्यावर जातात. शौचालयाचे महत्व पटवून देत बांधकामाला परावृत्त करण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा ‘भेटी-गाठी स्वच्छतेसाठी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. टंचाईमुळे रखडलेली कामे पाऊस पडल्यानंतर मार्गी लागतील, या अपेक्षेने जिल्हा परिषदेकडून नव्याने मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यभरात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात गृहभेट अभियान मोहीम हाती घेतली आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांना भेटी देऊन त्यांना शौचालयाचे महत्व पटवून दिले जाणार आहे. शौचालयाचा वापर हा सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण असल्याची जाणीव निर्माण करून देण्याचे काम शासनामार्फत केले जाणार आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यात ६१ हजार गृहभेटींद्वारे थेट कुटुंब प्रमुखाशी संंवाद साधला जाणार आहे. जिल्ह्यात ३ लाख २० हजार कुटुंब संख्या असून, यातील १ लाख १६ हजार कुटुंबांकडे अद्यापही शौचालय बांधलेले नाही. शौचालय बांधावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी नियोजन केले असून, वर्षभरात ६१ हजार शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून त्याचा वापर वाढावा, यासाठी २८४ ग्रामपंचायतींच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जलस्वराज्य, निर्मलग्राम योजनेच्या माध्यमातून अनेक गावे कागदोपत्री हागणदारीमुक्त झाली. या गावांनी शासनाचे पुरस्कारही घेतले. गावाबाहेर हागणदारीमुक्त गाव असे फलकही झळकले. मात्र हे फलक केवळ दिशाभूल करणारेच ठरले. शासनाचा निधी मिळेपर्यंत दिखावा करणारी गावे आता उघडी पडली आहेत. दुर्गंधीने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना शौचालयाबरोबरच आरोग्याचे महत्व पटवून देण्याची वेळ पुन्हा शासनावर आली आहे. त्यानुसार नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे.