दोन कोटींच्या कामांसाठी आता नव्याने निविदा
By Admin | Updated: September 28, 2016 00:40 IST2016-09-28T00:17:28+5:302016-09-28T00:40:20+5:30
सुनील कच्छवे , औरंगाबाद दोन कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या साखळी सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांसाठी नव्याने निविदा मागविण्यात आल्या आहेत. या कामांसाठी आधीही निविदा मागविण्यात आल्या होत्या

दोन कोटींच्या कामांसाठी आता नव्याने निविदा
सुनील कच्छवे , औरंगाबाद
दोन कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या साखळी सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांसाठी नव्याने निविदा मागविण्यात आल्या आहेत. या कामांसाठी आधीही निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार अनेक कंत्राटदारांनी निविदा दाखलही केल्या; परंतु त्रुटींमुळे सर्व ठेकेदारांच्या निविदा अपात्र ठरल्याचे लघु सिंचन विभागाने म्हटले आहे.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर साखळी बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. चालू आर्थिक वर्षातही साखळी बंधाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याला ठराविक निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार जुलै महिन्यात औरंगाबाद, जालना आणि परभणी जिल्ह्यातील १६ साखळी बंधाऱ्यांसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्याला कंत्राटदारांकडून प्रतिसादही मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यातील ३ साखळी सिमेंट बंधाऱ्यांसाठी ७ ठेकेदारांनी निविदा दाखल केल्या होत्या. याचप्रमाणे जालना आणि परभणी जिल्ह्यातही अनेक ठेकेदारांनी विहित मुदतीत निविदा भरल्या. परंतु लघु सिंचन विभागाने या सर्व ठेकेदारांच्या निविदा अपात्र ठरविल्या आहेत. कागदपत्रांची पूर्तता न झाल्याचे कारण देत या निविदा अपात्र ठरविण्यात आल्या. त्यामुळे आता लघु सिंचन विभागाने या कामांसाठी नव्याने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या कामांची एकत्रित किंमत २ कोटी ५ लाख रुपये इतकी आहे. निविदा भरण्यासाठी केवळ पाच दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.