जिल्ह्यातील तडीपारीचे सव्वाशे प्रस्ताव प्रलंबित
By Admin | Updated: August 22, 2016 01:28 IST2016-08-22T01:10:51+5:302016-08-22T01:28:13+5:30
लातूर : अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोेलिस प्रशासनाकडून जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवर

जिल्ह्यातील तडीपारीचे सव्वाशे प्रस्ताव प्रलंबित
लातूर : अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोेलिस प्रशासनाकडून जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची माहिती संकलित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सामाजिक शांतता बिघडविणाऱ्या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी तडीपारीची कारवाई केली जात आहे. गेल्या दोन वर्षांतील एकूण सव्वाशे तडीपारीचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित आहेत.
जिल्हा पोलिस दलाच्या वतीने गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ईदनिमित्त जिल्हाभरातील सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील गावांतील हालचालींवर प्रशासनाची करडी नजर आहे. ज्या गावांत गेल्या अनेक वर्षांपासून या काळात काही गुन्हेगारांकडून सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. लातूर जिल्ह्यातील पाच उपविभागाअंतर्गत येणाऱ्या २३ पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगार आणि त्यांच्या कारनाम्यांची माहिती पोलिसांकडून संकलित केली जात आहे. ज्या गुन्हेगारांकडून त्या-त्या गावांतील, नगरांतील सार्वजनिक शांततेला धोका आहे, अशा गुन्हेगारांवर तडीपारीसह इतर कारवाई प्रशासनाकडून केली जाणार आहे.
पोलिस प्रशासनाने महसूलच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे हे प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावाला उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर त्या-त्या पोलिस ठाण्यांकडून कारवाई केली जाणार आहे.