सव्वाअठरा कोटी पडून !
By Admin | Updated: September 6, 2015 23:56 IST2015-09-06T23:48:09+5:302015-09-06T23:56:21+5:30
उस्मानाबाद : केंद्र शासनाने नव्याने लागू केल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी आता थेट ग्रामपांयतींच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे.

सव्वाअठरा कोटी पडून !
उस्मानाबाद : केंद्र शासनाने नव्याने लागू केल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी आता थेट ग्रामपांयतींच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. यासाठीचे तब्बल १८ कोटी ३६ लाख रूपये जिल्हा परिशद वित्त विभागाकडे जवळपास महिनाभरापूर्वी उपलब्ध झाले आहेत. परंतु, प्रशासनाच्या म्हणण्यानुसार निधी वितरणाच्या मार्गदर्शक सूचना आल्या नसल्याने ही रक्कम पडून आहे.
पूर्वी तेराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत होता. परंतु, ग्रामपंचायत स्तरावर अवघा १० टक्के निधी जात होता. तसेच पंचायत समिती स्तरावर २० टक्के तर जिल्हा परिषद स्तरावरून ७० टक्के निधी खर्च केला जात होता. परंतु, केंद्र सरकारने ग्रामपंचायतींच्या सक्षमीकरणावर भर दिल्याने आता तेराव्या वित्त आयोगाऐवजी आता चौदावा वित्त आयोग सुरू करण्यात आला आहे.
या माध्यमातून उपलब्ध होणारी सर्व रक्कम ही थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचे सक्षमीकरणास अधिक गती येणार आहे. चालू आर्थिक वर्षात (२०१५-२०१६) या चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून १८ कोटी ३६ लाख रूपये मंजूर झाले आहे. ही रक्कम उपलब्ध होवून जवळपास महिनाभराचा कालावधी लोटला आहे. परंतु, तो अद्याप ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आलेला नाही. याबाबत जिल्हा परिषद पंचायत विभागाकडे विचारणा केली असता शासनाकडून निधी वितरणाच्या मार्गदर्शक सूचनाच मिळाल्या नाहीत. त्यामुळे निधी वितरित करण्यात अडचण येत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)