वीस दिवसांपासून तीन गावे अंधारात
By Admin | Updated: June 23, 2014 00:21 IST2014-06-22T22:56:45+5:302014-06-23T00:21:13+5:30
कडा: आष्टी तालुक्यात वीस दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. या तडाख्यात अनेकांची घरे पडली. शेती पिकांचे नुकसान झाले.

वीस दिवसांपासून तीन गावे अंधारात
कडा: आष्टी तालुक्यात वीस दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. या तडाख्यात अनेकांची घरे पडली. शेती पिकांचे नुकसान झाले. यासह महावितरणचे खांबही पडले. महावितरणने पडलेले खांब अद्यापही दुरुस्त न केल्याने तालुक्यातील वटणवाडी, खाकाळवाडी, जळगाव या तीन गावांतील वीजपुरवठा अद्यापही खंडित आहे.
आष्टी तालुक्याला वीस दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले होते. वादळाच्या तडाख्याने अनेकांचे पक्के, कच्च्या घरांसह गोठ्यांचेही नुकसान झाले होते. या आपत्तीत अनेक जनावरांसह कोंबड्याही दगावल्या होत्या. तालुक्यात कधी नव्हे ते इतके मोठे नैसर्गिक संकट आले. या वादळाचा तडाखा महावितरणलाही बसला. महावितरणचे अनेक विद्युत खांब पडले तर इतर डीपीही जळाल्या. या आपत्तीत महावितरणचे जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीतून अनेकजण सावरले असले तरी अद्यापही महावितरणला ‘शॉक’ बसलेलाच आहे. महावितरणचे कित्येक खांब अद्यापही पडलेले असून, ते दुरुस्त करण्याचे काम सुरुच आहे. गेल्या वीस दिवसांपासून वटणवाडी, खाकाळवाडी, जळगाव या परिसरातील विद्युत खांबांचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा बंदच आहे.
येथील विद्युत पुरवठा बंद असल्याने गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. महिला, वृद्ध, मुले यांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. महिलांना डोक्यावरुन पाणी आणावे लागते. यामुळे आजारही जडू लागले आहेत. तरुण मुले दुचाकीवरुन पाणी आणतात. यामुळे आर्थिक खर्चही वाढला आहे. वीस दिवस झाले तरीही येथील विद्युत पुरवठा सुरू होत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत, यास महावितरणचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या दैवशाला शिरोळे यांनी केला.
या परिसरात वीज नसल्याने शेतातील विद्युत पंपही बंद आहेत. यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांना विहिरीतून पाणी शेंदून जनावरांना पाजावे लागते.
या परिसरातील काही शेतकऱ्यांकडे भाजीपाल्यासह जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याचे पीक आहेत. यांना पाणी देण्यासही अडचणी निर्माण होत असल्याने ही पिकेही वाळून चालली आहेत. गावातील पिठाची गिरणीही बंद आहे. यामुळे ग्रामस्थांना कडा, आष्टी येथे जाऊन धान्य दळून आणावे लागते. एकंदरच या परिसरातील विद्युत पुरवठा २० दिवसांपासून बंद असल्याने येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील विद्युत पुरवठा तात्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. या परिसरातील विद्युत पुरवठा आठ दिवसांत दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दैवशाला शिरोळे, दादासाहेब जगताप, सचिन वाघुले यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. वटणवाडीसह परिसरातील तीन गावांचा विद्युत पुरवठा खंडित आहे. या संदर्भात महावितरणचे कडा येथील कनिष्ठ अभियंता काळे म्हणाले, वादळी वाऱ्यासह पावसाने विद्युत खांब पडले आहेत. ते दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत करु. (वार्ताहर)
वादळाच्या तडाख्याने झाला होता बिघाड
आष्टी तालुक्यात वीस दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेकांच्या घरांसह महावितरणचे खांबही पडले
तालुक्यातील वटणवाडी, जळगाव, खाकाळवाडी या परिसरातील विद्युत खांब अद्यापही दुरुस्त नसल्याने ग्रामस्थांवर अंधारात चाचपडण्याची आली वेळ
शेतातील विद्युत पंपही बंद असल्याने भाजीपाल्यासह जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न