बारा दिवसांचे युद्ध घनघोरच!
By Admin | Updated: October 3, 2014 00:31 IST2014-10-03T00:20:00+5:302014-10-03T00:31:54+5:30
जालना : विधानसभा निवडणुकीतील दसऱ्यापासून बारा दिवसांचे युद्ध घनघोरच होणार असून

बारा दिवसांचे युद्ध घनघोरच!
जालना : विधानसभा निवडणुकीतील दसऱ्यापासून बारा दिवसांचे युद्ध घनघोरच होणार असून उमेदवारांसमोर प्रचाराची मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. वातावरण पेटविण्याचा प्रयत्न सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून होत आहे.
आज दसरा. उद्या सकाळपासून विधानसभेचे युद्ध चांगलेच रंगणार आहे. जिल्ह्यात पाचही मतदारसंघांमधील राजकीय लढतीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. युती आणि आघाडीची ताटातूट झाल्याने शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी व अन्य घटक पक्षांमधील उमेदवार जोरदार प्रचाराला लागले आहेत. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत प्रचारदौरे सुरू आहेत.
मतदारांच्या गाठीभेटी, बैठका, कॉर्नर सभा, छोटेखानी व मोठया सभा, सेलिब्रिटींच्या सभा यात सर्वजण दंग झाले आहेत. व्यवस्थापनाची कामेही खूप असल्याने प्रत्येक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्तेही त्यात व्यस्त आहेत.
विशेषत: वाहन, कार्यालय, साहित्य, जेवणावळी, बुथनिहाय तयारी यामध्ये अधिक वेळ जात आहे. या सर्व बाबींमध्ये उमेदवारांचीही संमती घ्यावी लागत असल्याने सभा, बैठका याशिवाय प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत सकाळ, सायंकाळ चर्चेसाठीचा वेळ उमेदवारांना द्यावा लागत आहे. निवडणुकीतील वेळ अल्प आहे. त्यामुळे सगळी सोंगे करावी लागत आहेत. उमेदवारांना झोपेसाठी प्रत्यक्षात दोन-चार तासांचाच अवधी मिळत आहे. पहाटेपासून शहर व ग्रामीण भागात प्रचार दौऱ्यावर जावे लागत असल्याने अन्नपाणीही वेळेवर मिळेल किंवा नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागातील प्रचारावर प्रमुख उमेदवार जोर देत आहेत. बहुतांश उमेदवारांची पहिली फेरी पूर्ण झाली असून शहरात विविध भागात कॉर्नर बैठकाही घेण्यात येत आहेत.