शेतकऱ्यांसाठी बाराशे कोटी
By Admin | Updated: June 29, 2014 00:26 IST2014-06-29T00:06:07+5:302014-06-29T00:26:44+5:30
परभणी : यावर्षीच्या खरीप आणि रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना ११९४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी ठरविले आहे.

शेतकऱ्यांसाठी बाराशे कोटी
परभणी : यावर्षीच्या खरीप आणि रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना ११९४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी ठरविले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २५३ कोटी रुपये वाढीव कर्ज वाटप यावर्षी केले जाणार आहे.
मराठवाड्यात खरीप आणि रबी हे दोन महत्त्वपूर्ण हंगाम आहेत. या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना पैशांची निकड भासते. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेता, राष्ट्रीयीकृत बँकांकडून दरवर्षी शेतकऱ्यांना कृषी कर्ज वाटप केले जाते. गतवर्षी ९४०.८५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. बँकांनी १०५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करीत ९८७.६६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते.
जिल्ह्यातील सर्व बँकांनी प्राधान्य क्षेत्र आणि इतर क्षेत्रात कर्ज वाटप करावयाचा आराखडा जाहीर केला आहे. १६९२.०६ कोटी रुपयांचा हा आराखडा आहे. त्यात १६१.९६ कोटी रुपयांचे मुदत कर्ज, सुक्ष्म व लघू उद्योगासाठी ८०.५१ कोटी रुपयांचे गैर कृषी कर्ज, इतर प्राधान्य क्षेत्रासाठी (गृह, शैक्षणिक व इतर) १३७.६६ कोटी रुपये, गैरप्राधान्य क्षेत्रासाठी १२०.२९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे निश्चित केले आहे.
दरवर्षी बँकांना कृषी कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट दिले जाते. परंतु शेतकऱ्यांना हे कर्ज वेळेत मिळत नाही. बँक प्रशासन कागदपत्र आणि इतर कारणांमुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्यास भाग पाडते. वेळेत हे कर्ज मिळाले नाही तर हा पैसा शेतकऱ्यांना कामी येत नाही. शेतकऱ्यांच्या अडचणीत भरच पडत जाते. त्यामुळे बँकाँनी कृषी कर्जाचे वाटप वेळेत करावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
गतवर्षी असा होता आराखडा
२०१३-१४ या वर्षात बँकांनी कृषी कर्जासाठी ९४०.८५ कोटी, कृषी मुदत कर्जासाठी ११९.४० कोटी, गैरकृषी कर्जासाठी ७९.७७ कोटी, इतर प्राधान्य क्षेत्रातील कर्जासाठी १३०.१३ कोटी, गैरप्राधान्य क्षेत्रातील कर्जासाठी ९०.५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. गतवर्षी जिल्ह्यातील बँकांनी १३६०.६५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता.
प्राधान्याने कर्जपुरवठा करा : धस
कृषी विकासात बँकींग क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे बँकांनी ग्रामीण क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज असून, राष्ट्रीयीकृत बँकांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्जपुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री सुरेश धस यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पीककर्जासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा.संजय जाधव, आ.बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी एस.पी. सिंह, जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक पी.जी. जारोंडे, विजय भांबळे यांच्यासह सर्व बँकांचे व्यवस्थापक, सहकार व उद्योग विभागासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
धस म्हणाले, बँकांनी पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. जिल्ह्यातील खातेदारांची संख्या लक्षात घेता पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सर्व खातेदारांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. उद्दिष्टपूर्र्तीसाठी जिल्ह्यातील बँकांना नवीन खाती उघडण्याचे निर्देशही धस यांनी दिले.