बाराशे हेक्टर मका भुईसपाट
By Admin | Updated: September 1, 2014 00:43 IST2014-09-01T00:42:50+5:302014-09-01T00:43:17+5:30
सोयगाव : शहरासह तालुक्यात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर मका पिकाचे नुकसान झाले.

बाराशे हेक्टर मका भुईसपाट
सोयगाव : शहरासह तालुक्यात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर मका पिकाचे नुकसान झाले. उभी मका जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रत्यक्ष नुकसानग्रस्त क्षेत्राची माहिती घेण्यासाठी सोमवार दि. १ पासून महसूल आणि कृषी विभाग संयुक्त पाहणी करणार असल्याचे तहसीलदार नरसिंह सोनवणे यांनी सांगितले.
सोयगाव शहरासह परिसरात शनिवारी रात्री साडेदहा वाजेपासून बारा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. पावसासह जोरदार वादळी वारा असल्यामुळे उभा असलेले मका पीक जमीनदोस्त झाले. सोयगाव गलवाडा, आमखेडा परिसरात सुमारे १०० हेक्टर क्षेत्रावरील मका पिकाचे नुकसान झाले. सोयगाव -शेंदुर्णी, सोयगाव, बहिरोबा, सोयगाव, फर्दापूर या रस्त्यालगतच्या शिवारात नुकसान जास्त प्रमाणात झालेले आहे.
तसेच तालुक्यातील जरंडी लिंबायती बहुलखेडा, घोसला, बनोटी, तिडका, मुखेड, वाडी, पळाशी, रायरी, नायगाव, सोनसवाडी, वेताळवाडी, जंगल तांडा, फर्दापूर या गावातही वारा आणि पावसामुळे मका पिकाचे नुकसान झाले. याविषयी तालुका कृषी अधिकारी व्ही.एस. ठक्के यांच्याशी संपर्क साधला असता रविवार असल्यामुळे व पाऊस सुरू असल्यामुळे नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यात आलेली नाही; परंतु फर्दापूरपासून सोयगाव, बनोटीपर्यंत मका पिकाचे नुकसान झालेले आहे, असे ठक्के यांनी सांगितले.
तर तहसीलदार सोनवणे यांना विचारणा केली असता महसूल आणि कृषी विभागामार्फत संयुक्त पाहणी सोमवारपासून करण्यात येईल, असे सोनवणे यांनी सांगितले. काल रात्री सोयगाव मंडळात ४० मि.मी., बनोटी ३५ मि.मी. पावसाची नोंद झालेली असून आतापर्यंत तालुक्यात ३९१ मि.मी. पाऊस पडलेला आहे.
दरम्यान, निंबायती गावाजवळील पुलाच्या कामासाठी काढण्यात आलेला वळण रस्ता वाहून गेला. चार गावांची वाहतूक ठप्प झालेली आहे.
सोयगाव तालुक्यात यंदा पावसाअभावी दीड महिना उशिरा पेरण्या झाल्या. कुणी बँकेचे तर कुणी सावकाराचे कर्ज काढून खरिपाची पेरणी पूर्ण केली. खरिपाची आंतरमशागत केली, मका सध्या जोमात आलेली असताना मक्याचा धांडा पक्का झालेला असताना वारा आणि मुसळधार पावसाने मका होत्याची नव्हती झाली. कालपर्यंत उभे असलेले हिरवे राण मात्र जमीनदोस्त झालेले होते. त्यामुळे चांगला पाऊस पडल्याच्या आनंदाने शेतात गेलेल्या शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. तात्काळ पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.