बारावीचे विद्यार्थी अकरावीच्या उत्तरपत्रिका लिहिण्यात व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:05 IST2021-07-14T04:05:32+5:302021-07-14T04:05:32+5:30
औरंगाबाद : अकरावी रेस्ट इयर समजले जाते. परीक्षा दिली किंवा नाही दिली तरी अकरावी पास होतो. त्यामुळे विद्यार्थी जानेवारी, ...

बारावीचे विद्यार्थी अकरावीच्या उत्तरपत्रिका लिहिण्यात व्यस्त
औरंगाबाद : अकरावी रेस्ट इयर समजले जाते. परीक्षा दिली किंवा नाही दिली तरी अकरावी पास होतो. त्यामुळे विद्यार्थी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच बारावीच्या तयारीला लागतात. मात्र, कोरोनामुळे यावर्षी बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यावर अकरावीच्या गुणांचेही मूल्यांकन करण्यात येत आहे. त्याचे पुरावेही बोर्डात द्यावे लागत असल्याने आता बारावीत गेलेल्या विद्यार्थ्यांकडून अकरावीच्या उत्तरपत्रिका लिहून घेण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
प्रात्यक्षिक, सराव परीक्षा, इंटरनल असेसमेंट, प्रथमसत्र व द्वितीय सत्राच्या परीक्षांचे अभिलेखे विभागीय शिक्षण मंडळ निकालावेळी मागते. त्यामुळे पुढच्या वर्षीही अशीच परिस्थिती उद्भवल्यास अकरावीच्या अभिलेख्यांची गरज भासेल. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अकरावीच्या सराव परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, वार्षिक परीक्षांच्या उत्तरपत्रिका लिहून घेतल्या जात असल्याचे चित्र सोमवारी विभागीय शिक्षण मंडळासमोरच्या शहर बसस्थानकावर दिसून आले. नांदेडहून शहरातील महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले बारावीचे विद्यार्थी अकरावीच्या उत्तरपत्रिका लिहित चक्क शहर बसथांब्यावर बसलेले होते. हे विद्यार्थी वर्षभर महाविद्यालयात कोरोनामुळे येऊ शकले नव्हते. परीक्षा तर झाली नाहीच. मात्र, आता बारावीचा वर्ग सुरू होण्याच्या हलचाली सुरू होताच विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने बोलावून उत्तरपत्रिका लिहून आणायला सांगितल्या. त्यामुळे विद्यार्थी शहर बसथांब्यावर बसून उत्तरपत्रिका लिहित बसले होते. याविषयी विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार देत तेथून निघून गेले.