उलाढाल मोठी; सुरक्षा छोटी

By Admin | Updated: March 5, 2015 00:04 IST2015-03-04T23:42:34+5:302015-03-05T00:04:18+5:30

!बीड : सर्वसामान्य लोकांच्या कष्टाचा पैसा मोठ्या विश्वासाने बँकांमध्ये ठेवला जातो. मात्र, बँकांमध्येही सामान्यांची पुंजी सुरक्षित नाही.

Turnover big; Safety short | उलाढाल मोठी; सुरक्षा छोटी

उलाढाल मोठी; सुरक्षा छोटी

 

!बीड : सर्वसामान्य लोकांच्या कष्टाचा पैसा मोठ्या विश्वासाने बँकांमध्ये ठेवला जातो. मात्र, बँकांमध्येही सामान्यांची पुंजी सुरक्षित नाही. गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये तीन वेळा दरोड्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे बँक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बुधवारी ‘लोकमत’ने ग्रामीण भागातील बँकांच्या सुरक्षेचे स्पॉट रिपोर्टिंग केले. कुठे तकलादू दरवाजे तर कुठे नादुरूस्त सीसीटीव्ही. काही ठिकाणी सुरक्षारक्षकच नाहीत, अशा धक्कादायक बाबी या पाहणीत समोर आल्या.
ना सीसीटीव्ही, ना रक्षक
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. या दोन्ही बँका गावापासून बाजूला आहेत. मात्र, तेथे ना सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत ना सुरक्षारक्षक नेमला आहे. मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत लोखंडी गेट देखील नाही. साधा दरवाजा आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचीही याहून वेगळी स्थिती नाही. त्यामुळे येथे बँकांची सुरक्षा धोक्यात आहे. ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी एस. डी. मुळे म्हणाले, सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरच उपाययोजना करण्यात येतील.
धामणगावात नुस्ताच देखावा
आष्टी तालुक्यातील धामणगाव हे उपबाजारपेठेचे गाव म्हणून प्रसिध्द आहे. येथे हैद्राबाद बँकेची शाखा आहे. मात्र, येथे शाखेने सुरक्षेची योग्य ती काळजी घेतल्याचे दिसून आले नाही. बँकेची इमारत गावातील मुख्य रस्त्यावर असून तेथे सीसीटीव्ही कॅमेरे तर नाहीतच शिवाय सुरक्षारक्षक देखील नाही. केवळ इमारत मोठी असून सुरक्षेच्या बाबतीत बोंब आहे. महत्त्वाचे म्हणजे बँकेतील कर्मचारी अप-डाऊन करतात. त्यामुळे बँक बेभरोसे आहे.
शाखा व्यवस्थापक बी. बी. काथले म्हणाले, सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षारक्षकाबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव ठेवला आहे. मंजुरी येताच उपाययोजना करण्यात येतील.
तळमजल्यात शाखा
माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा चक्क तळमजल्यात भरते. छोटीवाडी, मोठीवाडी, रामनगर, खरात आडगाव, गुंजथडी, सोमठाणा, आडुळा, बोरगाव, सरवर पिंपळगाव या गावातील लोक येथे येतात. मात्र, सुरक्षेच्या बाबतीत बँकेने कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. सीसीटीव्ही तर दूरच, परंतु बँकेचे दरवाजेही साधे आहेत. रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक नसतो.
माजलगावात केवळ लोखंडी प्रवेशद्वार
माजलागाव शहरातील ग्रामीण बँक तसेच सांगली अर्बन को-आॅप. बँकेमध्ये सुरक्षिततेसाठी केवळ लोखंडी प्रवेशद्वार लावले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे बँकेच्या आवारातील हालचालींवर लक्ष ठेवता येत नाही. परिणामी सुरक्षितता धोक्यात असून योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
कोळगावात तिसऱ्या दिवशीही सुरक्षा वाऱ्यावर
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये तिसऱ्यांदा चोरीचा प्रयत्न झाला. याउपरही बँक अधिकारी ‘धडा’ घ्यायला तयार नाहीत. बुधवारी तिसऱ्या दिवशीही बँकेची सुरक्षा अक्षरश: वाऱ्यावर होती. येथे ना सुरक्षारक्षक नेमलेला आहे ना सीसीटीव्ही आहेत.
त्यामुळे बँक लुटीचा तिसऱ्यांदा प्रयत्न होऊनही अधिकारी गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी रात्री बँकेत चोरीचा प्रयत्न झाला. सुदैवाने तिजोरी वाचली. बुधवारी तिजोरीला सायरन बसविण्यात आले आहे मात्र, सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना नाहीत.
दरम्यान, बँकेत चोरीचा सलग तिसऱ्यांदा प्रयत्न झाल्याने बँकेचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्यात येतील, असे शाखा व्यवस्थापक आर. बी. तांदळे यांनी सांगितले.
चकलांबा ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप तेजनकर म्हणाले की, या बँकेत तिनदा चोरीचा प्रयत्न झालेला आहे. तीन्ही वेळचे चोर एकच असावेत, असा संशय आहे. काही संशयितांची चौकशी सुरू आहे. लवकरच चोरांना गजाआड करण्यात येईल. (प्रतिनिधींकडून)
जिल्ह्यातील बँकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांकडे बँक अधिकारीच दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
४सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
४बँकेच्या तिजोरीच्या ठिकाणी पक्के दरवाजे बसवावेत.
४खिडक्या, भिंती मजबूत हव्यात.
४२४ तास सुरक्षारक्षक तैनात असावा, या सूचना पोलिसांनी बँकांना दिलेल्या आहेत.
बँक फोडणाऱ्या टोळीचा बंदोबस्त केला आहे. सुरक्षेबाबत वेळोवेळी बँक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सीसीटीव्ही अनिवार्य केले आहेत. त्यांनी सूचनांचे पालन करावे. पुन्हा एकदा बैठक घेण्यात येईल.
- नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक

Web Title: Turnover big; Safety short

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.