आयुष्याला कलाटणी
By Admin | Updated: July 12, 2014 01:02 IST2014-07-12T01:02:19+5:302014-07-12T01:02:19+5:30
डॉ. जावेद मुकर्रम, शास्त्रज्ञ आयुष्यात चांगला गुरू मिळणे हा नशिबाचाच एक भाग म्हणावा लागेल. मला एक नव्हे तर दोन चांगले गुरू मिळाले. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.
आयुष्याला कलाटणी
डॉ. जावेद मुकर्रम, शास्त्रज्ञ
आयुष्यात चांगला गुरू मिळणे हा नशिबाचाच एक भाग म्हणावा लागेल. मला एक नव्हे तर दोन चांगले गुरू मिळाले. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.
औरंगाबाद शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना केमिस्ट्रीसाठी ओ.जी. मुंदडा म्हणून प्राध्यापक होते. त्यांची शैली एवढी अप्रतिम होती की, मी केमिस्ट्रीच्या प्रेमात पडलो. हा विषय मुंदडा सरांमुळे खूपच सोपा वाटू लागला. अत्यंत शांतपणे ते मुलांना शिकवीत असत. त्यांच्या वर्गात बसल्यावर क्षणभरही मन विचलित होत नसे. मुंदडा सरांमुळे मी खूप काही शिकलो. त्यानंतर मी नॅशनल केमिकल लॅबमध्ये पीएच.डी. करीत होतो. तेथील माझे गाईड डॉ. ए.व्ही. रामाराव यांनी मला खऱ्या अर्थाने घडविण्याचे काम केले.
मी त्यांच्यासाठी एक साधारण विद्यार्थी होतो. ते विद्यार्थ्यांकडून कठोर मेहनत करून घेत होते. आयुष्यात कितीही मोठी समस्या समोर आली तरी न घाबरता तिचा मुकाबला करायचा हे सरांनी शिकविले. रामाराव या सरांमुळेच मला संशोधनात खूप काही शिकायला मिळाले, हीच आयुष्याची शिदोरी समजून मी यशाची शिखरे पादाक्रांत करीत गेलो. हार्डवर्क करणाऱ्याला पर्याय उरत नाही, असे रामाराव सर नेहमी म्हणत असत. विद्यार्थ्यांच्या पीएच.डी.वर शासन दहा लाख रुपये खर्च करते, तुम्ही या देशाला काय देणार, असा प्रश्न ते उपस्थित करीत असत.
विद्यार्थ्यांना कधीही निराश न होऊ देणे ही त्यांची खासियत होती. जास्तीत जास्त काम करण्याची सवयच त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना लावली होती. त्यांचे ऋण आम्ही कधीच विसरू शकणार नाही.