वळणाने घात केला, दोन तरुणांचा संसार उघड्यावर आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:09 IST2021-01-08T04:09:02+5:302021-01-08T04:09:02+5:30
लाडसावंगी : लाडसावंगी ते चौका या मुख्य रस्त्यावर लाडसावंगी गावाजवळून दोन किलोमीटर अंतरावर आतापर्यंत दहा अपघात झाले. शिवाय, रविवारी ...

वळणाने घात केला, दोन तरुणांचा संसार उघड्यावर आला
लाडसावंगी : लाडसावंगी ते चौका या मुख्य रस्त्यावर लाडसावंगी गावाजवळून दोन किलोमीटर अंतरावर आतापर्यंत दहा अपघात झाले. शिवाय, रविवारी झालेल्या अपघाताने वळण रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रविवारी पुन्हा एकदा झालेल्या गवळीमाथा वळणावर दोन जणांचा बळी गेला. तरीदेखील बांधकाम विभाग येथे दिशादर्शक फलक लावेेना की मार्कीगदेखील करेना. आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे, असा प्रश्न गावकरी करू लागले आहेत.
लाडसावंगी ते चौका महामार्ग आधीच खड्ड्यात हरवला आहे. गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने थातूरमातूर खड्डे बुजविण्याचा दिखावा केला. कारण, आठ दिवसांतच जैसे थे परिस्थिती निर्माण झाली. तर रविवार (दि. ३) सायंकाळी सात वाजेदरम्यान चौका गावाकडून लाडसावंगीकडे येणाऱ्या व लाडसावंगी गावाकडून चौकाकडे जाणाऱ्या दुचाकीचा गवळीमाथा वळणावर समोरासमोर अपघात झाला. यात दोन जणांना जीव गमवावा लागला.
लाडसावंगी शिवारात गवळी माथा वळण हे सर्वात मोठे आहे. या ठिकाणी गेल्या वर्षभरात दोन मोठे अपघात होऊन तिघांचा जीव गेला आहे. आठ किरकोळ अपघात झाले. हे वळण अपघाताचा डेंजर पॉईंट झाला बनला आहे. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे या ठिकाणी दुर्लक्ष केले आहे. या वळणावर कोणताही दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही. तर मार्कींगदेखील केलेली नाही.
---------------
फोटो : लाडसावंगी ते चौका महामार्गावर हेच ते अपघाती वळण आहे. जे अपघातासाठी डेंजर पॉईंट बनले आहे. झाडेझुडपे वाढल्याने समोरून येणारे वाहनदेखील दिसत नाही.