केबल टाकण्यासाठी सहा तास वीज बंद
By Admin | Updated: June 13, 2017 01:05 IST2017-06-13T01:03:23+5:302017-06-13T01:05:09+5:30
औरंगाबाद : महावितरण कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता शहर विभाग-२ अंतर्गत येणाऱ्या परिसराचा वीजपुरवठा केबल बदलण्यासाठी सहा तास खंडित केला.

केबल टाकण्यासाठी सहा तास वीज बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महावितरण कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता शहर विभाग-२ अंतर्गत येणाऱ्या परिसराचा वीजपुरवठा केबल बदलण्यासाठी सहा तास खंडित केला. परिणामी नागरिकांना दमट वातावरणामुळे उकाड्याने त्रस्त व्हावे लागले.
फ्यूज कॉल सेंटरला याबाबत विचारणा केली असता रोज सहा तास वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. टप्प्या-टप्प्याने वायरिंग बदलण्यात येत असल्याचे कॉल सेंटरवरून सांगण्यात आले. ही कामे उन्हाळ्यात का केली नाहीत, असा सवाल वीज ग्राहकांनी केला असता पावसाळ्याच्या तोंडावर दुरस्तीची कामे केली जातात असे ग्राहकांना फ्यूज कॉल सेंटरवरून सांगण्यात आले.
सकाळी पहिल्या टप्प्यात ९ वाजेपासूनच विजेचा लपंडाव सुरू झाल्याने पुंडलिकनगरमधील ग्राहकांनी कंपनी कार्यालयाशी संपर्क केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर १२ वा. वीजपुरवठा बंद करण्यात आला. दिवसभर नागरिकांना विजेअभावी उकाड्याचा सामना करावा लागला. ट्री कटिंगसाठी तीन तासांचे सक्तीचे लोडशेडिंग दर शुक्रवारी केले जाते; मात्र सोमवारी अचानक वीजपुरवठा सहा तासांसाठी बंद केल्याने नागरिकांचे हाल झाले. सायंकाळी ६ वा. वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पावसाळा सुरू झाला आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. कंपनी दीड महिन्यापासून मान्सूनपूर्व कामे करीत आहे; परंतु अजूनही ती कामे पूर्ण न झाल्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावरच विजेचा लपंडाव सुरू आहे.