शेतकऱ्यांच्या हितासाठीच तूर खरेदी केंद्र!
By Admin | Updated: January 21, 2017 00:11 IST2017-01-21T00:09:23+5:302017-01-21T00:11:50+5:30
जालना : गत वर्षी १४ हजारांवर गेलेला तूरीचा प्रतिक्विंटल दर यंदा साडेतीन हजारावरच राहिलेला आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठीच तूर खरेदी केंद्र!
जालना : गत वर्षी १४ हजारांवर गेलेला तूरीचा प्रतिक्विंटल दर यंदा साडेतीन हजारावरच राहिलेला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी मार्केट फेडरेशनच्या संचालकांना सूचना केल्यानंतर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांना केले.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजार समिती, मार्केटिंग फेडरेशन, खरेदी विक्री संघ आणि नाफेड या संस्था शेतकऱ्यांसाठी एकत्र येऊन काम करतात. काही दिवसांपूर्वी फेडरेशनच्या संचालक निलीमा केरकट्टा यांनी या केंद्रास भेट देऊन पाहणी केली होती. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या होत्या. केंद्राच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त केले होते. त्यानंतर पांढऱ्या तुरीबरोबरच याच दरात भगवी आणि काळी तूर खरेदी केली जावी, अशी सूचना राज्यमंत्री खोतकर यांनी केरकट्टा यांना केली होती. त्यांनी ती तात्त्काळ मान्य केली. सद्यस्थिती काळी तूर प्रतिक्विंटल ३४०० ते ३६००, भगवी तूर प्रतिक्िवंटल ३५०० ते ३७०० असा दर आहे. परंतु फेडरेशनच्या निर्णयामुळे हा तूर ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे खरेदी केला जाणार असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे. राज्यमंत्री खोतकर यांनी शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सुरु करण्यात आलेल्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्राची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मोठ्या आकाराची चाळणी व त्यासाठी आकारले जाणारे पैसे या व इतर मुद्द्यांवर राज्यमंत्री खोतकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ योग्य चाळणीची व्यवस्था केली. यावेळी बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, व्यापारी आणि शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)