तूर, हरभरा दरात तेजी, किराणा स्थिर
By Admin | Updated: March 28, 2016 00:08 IST2016-03-27T23:54:38+5:302016-03-28T00:08:24+5:30
जालना : दुष्काळी स्थितीमुळे बाजार समितीत शांतता असली तरी या आठवड्यात तूर, हरभरा, सोयाबीन आदी भुसार मालांचे भाव वाढण्यासोबतच आवकही बऱ्यापैकी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.

तूर, हरभरा दरात तेजी, किराणा स्थिर
जालना : दुष्काळी स्थितीमुळे बाजार समितीत शांतता असली तरी या आठवड्यात तूर, हरभरा, सोयाबीन आदी भुसार मालांचे भाव वाढण्यासोबतच आवकही बऱ्यापैकी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.
बाजार समितीत या आठवड्यात तुरीचे भावत तीनशे ते चारशे रूपयांनी वधारले आहेत. तुरीचे भाव प्रति क्विंटलला ८८०० - ८००० दरम्यान आहेत. गत काही दिवसांपूर्वी भाव कमी झाले होते. आवक ५०० क्विंटलपेक्षा जास्त होत आहे. हरभऱ्याचे भावही ४३०० ते ४४५० दरम्यान आहेत. आवक १ हजार क्विंटल होत आहे. सोयाबीनची आवक दाररोज ४०० क्विंटल एवढी असून, भाव ३९५० ते ३८०० दरम्यान आहेत. भुसार मालाचे भाव बऱ्यापैकी वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गव्हाचे भावही १६०० ते २२०० प्रति क्विंटल दरम्यान आहेत.
आवक १ हजार पोत्यांची होत आहे. पेशी गहू ३५०० रूपये प्रति क्विंटल आहे. पेशी गव्हाची आवक तुलनेने कमी आहे. ज्वारीचे भाव १६०० ते २२०० रूपये प्रति क्विंटल आहेत. आवक १ हजार पोत्यांपेक्षा जास्त आहे.
भुसार माल वगळता अन्य मालाचे भाव स्थिर आहेत. यात प्रामुख्याने किराणा बाजारात शांतता आहे. लग्नसराई असली तरी मालाची आवक तसेच भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. साखरेच्या भावातही तेजी नाही. साखर बाजारपेठेतही भाव स्थिर असल्याने मालाची आवक कमी आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसारसह विविध अन्य मालाची ठोक दुकाने आहेत. दुष्काळी परिस्थिती तसेच पाणीटंचाईमुळे भाजीपाला तसेच फळ मार्केटही शांत आहेत. टरबूज, खरबूज तसेच शहाळ्यांची आवक वाढत आहे. दिवसाकाठी एक ट्रक माल येत असल्याचे संबंधित व्यापारी सांगतात. अननसची मागणी वाढली आहे.
ग्रामीण दुष्काळामुळे शुकशुकाट असल्यामुळे त्याचा परिणाम बाजार समितीत दिसून येतो. एरवी असलेली वर्दळ रोडावली आहे. मोसंबीची आवक किरकोळ स्वरूपाची आहे.
या विषयी बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले म्हणाले की, या आठवड्यात भुसार मालाचे भाव वधारले असले तरी इतर मालाचे भाव स्थिर आहेत.
विशेषत: तूर, हभरा आदींचे भावात चांगली तेजी आल्याने व्यापारी तसेच शेतकरी समाधानी आहेत. दुष्काळी परिस्थितीचा काहीअंशी परिणाम होत असल्याचे चौगुले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)