तुळजाभवानी संघाच्या शाखेला वर्षभरातच टाळे
By Admin | Updated: August 22, 2014 00:58 IST2014-08-22T00:49:49+5:302014-08-22T00:58:05+5:30
बालाजी बिराजदार , लोहारा तुळजाभवानी जिल्हा दुध संघाने लोहारा येथे सुरू केलेली शाखा केवळ वर्षभर कशीबशी चालू शकली. यानंतर या शाखेला चक्क कुलूपच लागले.

तुळजाभवानी संघाच्या शाखेला वर्षभरातच टाळे
बालाजी बिराजदार , लोहारा
तुळजाभवानी जिल्हा दुध संघाने लोहारा येथे सुरू केलेली शाखा केवळ वर्षभर कशीबशी चालू शकली. यानंतर या शाखेला चक्क कुलूपच लागले. त्यामुळे तालुक्यातील हजारो लिटर दूध सध्या खाजगी संकलन केंद्राकडे जात आहे.
लोहारा तालुक्यात मागील अनेक वर्षापासून कुठलाही मोठा उद्योगधंदा नव्हता. दोन वर्षापूर्वी लोकमंगलने साखर कारखाना उभा केला. मात्र, तालुक्याचा मुख्य व्यवसाय शेतीच असून, याला जोडधंदा म्हणून लोहारा, धानुरी, नागूर, हराळी, तोरंबा, विलासपूर पांढरी, सय्यद हिप्परगा, कास्ती (बु.), कास्ती (खुर्द), वडगाव, मार्डी, वडगाववाडी, हिप्परगा (रवा) या भागामध्ये पशुपालन उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. अनेकांच्या संसाराचा गाडाच दूध व्यवसायावर आहे.
तालुक्यात २५ ते ३० दूध संस्था असून, या संस्थांपैकी काहीजण खाजगी तर काही संस्था उमरगा येथील शासकीय दूध डेअरीकडे दूध घालतात. काही संस्था चक्क बंद आहेत. तालुक्यातून दररोज साधारण १५ ते २० हजार लिटर दूध संकलित होते. हे दूध सध्या सोलापूर, ईटकळ, बोरी, मातोळा, उमरगा येथील शासकीय दूध डेअरी आदी संकलन केंद्राकडे जात आहे. १ मे २०१३ रोजी तुळजाभवानी जिल्हा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाने लोहारा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे शाखा सुरु केली. याला दूध उत्पादकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. येथील संकलन दिवसाला पाच हजार लिटरपर्यंत जाऊन पोहोंचले होते. परंतु, एप्रिल २०१४ मध्ये ही शाखा बंद पडली. ती आजही बंदच आहे. यामुळे तालुक्यातील दूध उत्पादकांना खाजगी केंद्रांचाच आधार घ्यावा लागत आहे.
तुळजाभवानी जिल्हा दुध संघाने लोहारा येथे शाखा सुरू केल्यानंतर यास दूध उत्पादकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु, कालांतराने दूध उत्पादक, वाहन ठेकेदार आदींची देणी मोठ्या प्रमाणात थकल्यामुळे संघाच्या शाखेला कुलूप लागले. या संघाकडून तालुक्यातील दूध संस्था, वाहन ठेकेदार यांचे सुमारे २० ते २५ लाख रुपये येणे बाकी आहे. यामुळे अनेकजण आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
लोहारा शहरातील माऊली दूध संस्थेचे तुळजाभवानी जिल्हा दूध संघाकडे २० हजार रुपये अडकले असून, दूध उत्पादकांना तर आठवड्याला आम्हाला पैसे द्यावे लागतात. पण जिल्हा संघाने दिले नाहीत. त्यामुळे दूध संस्था अडचणीत सापडली आहे, असे या संस्थेचे चेअरमन अविनाश माळी यांनी सांगितले.
४कर्ज काढून घेतलेले वाहन या संघाच्या लोहारा शाखेकडे वाहतुकीसाठी लावले होते. संघाकडून सुरुवातीला वेळेवर भाडे मिळाले. मात्र, कालांतराने भाडेच मिळाले नाही. आता तर संघच बंद पडल्यामुळे या वाहन भाड्याचे तीस लाख रूपये अडकले असल्याचे वाहन ठेकेदार अरुण वाघमारे यांनी सांगितले.