तुळजाभवानीच्या शाकंभरी महोत्सवास आजपासून प्रारंभ
By Admin | Updated: December 29, 2014 00:56 IST2014-12-29T00:52:11+5:302014-12-29T00:56:27+5:30
तुळजापूर : श्री तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास सोमवारपासून दुपारच्या घटस्थानेने प्रारंभ होणार असून, ६ जानेवारी रोजी मंदिर संस्थानच्या वतीने महाप्रसादाने सांगता होणार आहे.

तुळजाभवानीच्या शाकंभरी महोत्सवास आजपासून प्रारंभ
तुळजापूर : श्री तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास सोमवारपासून दुपारच्या घटस्थानेने प्रारंभ होणार असून, ६ जानेवारी रोजी मंदिर संस्थानच्या वतीने महाप्रसादाने सांगता होणार आहे.
२२ डिसेंबर रोजी रात्री श्री तुळजाभवानी मातेच्या शेजघरातील मंचकावर मोहनिद्रेस प्रारंभ झाला. सदरची निद्रा सोमवारी दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर पहाटे साडेतीन वाजता संपून श्री तुळजाभवानी मातेची पूर्ववतपणे सिंहासनावर प्रतिष्ठापना होवून विशेष पंचामृत अभिषेकास प्रारंभ होईल. तत्पूर्वी नित्योपचार ‘चरणतीर्थ’ पूजा होवून महंत व भोपी पुजारी श्री तुळजाभवानीची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापीत करतील. यावेळी धुपारती, नैवेद्य हे धार्मिक विधी पार पडतील. सकाळी ७ वाजता नित्योपचार अभिषेक पूजेस प्रारंभ होवून अंगारा हा विधी पार पडेल. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राजमाताच्या हस्ते गणेश विहारात शाकंभरी देवीची घटस्थापना होईल. यानंतर ब्राम्हणवृंदास राजमातातर्फे अनुष्ठानाची वर्णी देण्यात येईल. याचवेळी तुळजाभवानीची नित्योपचार अलंकार पूजा मांडली जाईल. सायंकाळी ७ वाजता नित्योपचार अभिषेक पूजा होवून त्यानंतर शाकंभरी नवरात्रानिमित्त विशेष छबीना काढण्यात येईल. याचवेळी प्रक्षाळ या जलविधीस प्रारंभ होवून प्रक्षाळ मंडळ, महंत, भोपी पुजारी सेवेकरी यांच्या आरती स्तवनाने शाकंभरी नवरात्रातील पहिल्या माळेची सांगता होईल.४
शाकंभरी नवरात्र महोत्सव हा पुजारी वर्गाचा असतो. या नवरात्राचे यजमानपदही भोपी, पाळीकर अथवा उपाध्ये यांच्यापैकी एकाकडे असते. अशी परंपरा १९७३ पासून चालत आहे. परंतु २७ रोजीपर्यंत तरी यजमानाचे नाव अजूनही जाहीर झाले नाही. त्यामुळे यजमान कोण? याबद्दल शहरवासियात मोठी उत्सुकता लागली आहे.