कायद्याचा धाक दाखवून उद्दिष्टपूर्तीचा केविलवाना प्रयत्न !
By Admin | Updated: November 29, 2015 23:17 IST2015-11-29T23:11:34+5:302015-11-29T23:17:54+5:30
लातूर : उघड्यावर शौचालयाला बसल्यास ६ महिन्यांची कैद आणि १२०० रुपयांचा दंड असा धाक दाखवून शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा केविलवाना प्रयत्न ‘मिशन स्वच्छ

कायद्याचा धाक दाखवून उद्दिष्टपूर्तीचा केविलवाना प्रयत्न !
लातूर : उघड्यावर शौचालयाला बसल्यास ६ महिन्यांची कैद आणि १२०० रुपयांचा दंड असा धाक दाखवून शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा केविलवाना प्रयत्न ‘मिशन स्वच्छ भारत अभियाना’मार्फत सुरु असला तरी पाणीटंचाईपुढे अभियान हतबल झाले आहे़ पाच रुपयाला एक घागर घेऊन तहान भागविण्याची वेळ ग्रामीण भागातील जनतेवर आहे़ तिथे शौचालयाचे बांधकाम कसे करावे, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे़ परिणामी, शौचालयाचे उद्दिष्ट एक तृतियांशही पूर्ण झाला नाही़ ४७ हजार उद्दिष्टांपैकी केवळ १२ हजार शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे़
कायदा स्वच्छतेचा़़़ शौचालये बांधकामाचा़़़ आरोग्य संपन्नतेचा़़़ अशा आशयाची घडीपत्रिका व बॅनर लावून शौचालये बांधकामाची मोहीम जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन स्वच्छ भारत’ या अभियानामार्फत राबविली जात आहे़ यंदा ४७ हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट आहे़ उघड्यावर शौचालयाला गेल्यास पोलिस अधिनियम ५१ (अ) कलम ११५, ११७ नुसार गुन्हा दाखल केला जाईल, या गुन्ह्यानुसार सहा महिन्याची कैद व १२०० रुपयांचा दंड लागतो, अशी जनजागृती करुन शौचालये बांधण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत़ परंतू ग्रामीण भागात पाण्याची टंचाई आहे़ पिण्यासाठी पाणी नाही तिथे बांधकाम कसे करावे, असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला पडला आहे़ पाणी द्या, शौचालये बांधतो, असे गावकरी अभियानातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना म्हणत आहेत़ पाझर तलाव, साठवण तलाव, विहिरी, विंधन विहिरी कोरड्याठाक आहेत़ पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या योजनांचे स्त्रोतही कोरडे आहे़ जिथे पाणी पिण्याचीच सोय नाही, तिथे बांधकाम कसे करणे शक्य नाही, असे अधिकारीही खाजगीत म्हणत आहेत़ परंतू उद्दिष्ट असल्यामुळे त्यांना जनजागृती करावी लागत आहे़
गेल्या तीन वर्षांपासून शौचालयांचे बांधकाम लातूर जिल्ह्यात पूर्ण झाले आहे़ २०१४-१५ मध्ये २६ हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट होते़ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्याने उद्दिष्टापेक्षा १ हजार अधिक शौचालये बांधली़ २०१३-१४ मध्ये २४ हजारांचे उद्दिष्ट होते तर २५ हजार शौचालये बांधली़ २०१२-१३ मध्ये २२ हजारांचे होते़ २३ हजार पूर्ण केले़ यंदा मात्र ४७ हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट आहे़ केवळ १२ हजार शौचालये बांधण्यात यश आले आहे़ आणखी ३५ हजार शौचालये बांधणे पाणी नसल्यामुळे अशक्य आहे, असे अधिकारीही म्हणतात़ (प्रतिनिधी)