जात बदलून सायकली लाटण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: December 6, 2014 00:18 IST2014-12-06T00:08:53+5:302014-12-06T00:18:10+5:30
रऊफ शेख, फुलंब्री जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने वैयक्तिक लाभाच्या सायकल वाटप योजनेत मागासवर्गीय समाजाच्या सवलती लाटण्याचा प्रयत्न करीत जात बदलून सायकल वाटपाची यादी मंजूर केली,

जात बदलून सायकली लाटण्याचा प्रयत्न
रऊफ शेख, फुलंब्री
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने वैयक्तिक लाभाच्या सायकल वाटप योजनेत मागासवर्गीय समाजाच्या सवलती लाटण्याचा प्रयत्न करीत जात बदलून सायकल वाटपाची यादी मंजूर केली, हा धक्कादायक प्रकार फुलंब्री तालुक्यात घडला.
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने मागास्वर्गीय लाभार्थ्यांसाठी उपक्रमांतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजना राबविते. यात ग्रामीण भागातील मागासवर्गीय मुलींना शाळेत जाण्या-येण्यासाठी सायकली देण्याची योजना आहे. या योजनेत २०१२-१३ साली फुलंब्री तालुक्यातील ६१ मुलींना सायकली मंजूर झाल्या. मंजूर केलेल्या यादीत मुलीच्या नावासमोर जातीचा उल्लेख करावा लागतो. मंजूर केलेल्या सर्वच मुलींच्या नावासमोर जातीचा स्वच्छ उल्लेख आहे.
यात सोनारी, निधोना, पाडळी, नायगाव, हिवरा, डोंगरगाव येथील मराठा समाजाच्या असलेल्या दहा मुलींच्या नावासमोर महार अशी जात टाकलेली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केली असून मंजूर केलेल्या यादीतील दहा मुली मराठा जातीच्या असताना त्यांच्यासमोर महार जात टाकून सायकली मंजूर करुन घेतल्या.
फुलंब्री पंचायत समितीकडून समाजकल्याण अधिकारी यांना पाठविलेल्या यादीत त्या दहा मुलींची नावे नाहीत. मग जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयातून मंजूर केलेल्या यादीत ही नावे कशी आली असा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता तालुकास्तरावरील गटविकास अधिकारी यांच्याकडून पाठविलेल्या यादीवरच विचार व्हायला पाहिजे होता; पण तसे झाले नाही. केवळ सायकल मिळविण्यासाठी जात बदलून फायदा घेण्याचा हा प्रयत्न पहिल्यांदाच झाला आहे. या प्रकरणी समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क केला असता कार्यालयातील सावळा गोंधळ दिसून आला. कर्मचारी जागेवर नव्हते.
समाजकल्याण अधिकारी यांना निलंबित केल्यानंतर या कार्यालयाचा कारभार डेप्युटी सीईओ कदम यांच्याकडे आहे. त्यांना या प्रकरणी विचारले असता सदरील मंजूर यादी ही खरी आहे एवढेच त्यांनी सांगितले.
दरम्यान सायकल वाटप योजनेत मंजूर केलेल्या यादीवर समाजकल्याण सभापती व समाज कल्याण अधिकारी यांच्या सह्या आहेत.