औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठासाठी प्रयत्न करू : शिरगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:44 IST2017-12-29T00:43:55+5:302017-12-29T00:44:09+5:30
ऐतिहासिक औरंगाबाद शहरात क्रीडा विद्यापीठासाठी आपण प्रयत्न करू आणि हा प्रकल्प याच शहरात व्हावा यासाठी पुढाकार घेऊ, असा शब्द भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे नवनिर्वाचित सहसचिव नामदेव शिरगावकर यांनी आज दिला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात एकाच खेळाच्या दोन संघटना आणि त्यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यावर भर देऊ, असेही त्यांनी सांगितले.

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठासाठी प्रयत्न करू : शिरगावकर
औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरात क्रीडा विद्यापीठासाठी आपण प्रयत्न करू आणि हा प्रकल्प याच शहरात व्हावा यासाठी पुढाकार घेऊ, असा शब्द भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे नवनिर्वाचित सहसचिव नामदेव शिरगावकर यांनी आज दिला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात एकाच खेळाच्या दोन संघटना आणि त्यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यावर भर देऊ, असेही त्यांनी सांगितले.
आॅलिम्पिक संघटनेचे सहसचिव झाल्यानंतर शिरगावकर प्रथमच औरंगाबादेत आले होते. पुणे आणि मुंबईत क्रीडा सुविधांची कमतरता नाही. त्यामुळे औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ व्हावे व ते इतरत्र नेले जाऊ नये यासाठी प्रयत्न करू आणि वेळप्रसंगी क्रीडामंत्र्यांची भेटही घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
राज्य जिम्नॅस्टिक संघटनेचा वाद संपुष्टात आणण्यासाठी तीन जणांची समिती होती. त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आता हा वाद राहिला नसून, फक्त पदांपुरता विषय आहे. यातील मतभेद तीन महिन्यांत मार्गी लागतील आणि सुवर्णमध्य साधण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अ.भा. तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, राज्य स्क्वॅश संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खांड्रे, रणजित भारद्वाज, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव उदय डोंगरे आदी उपस्थित होते.