संभाजीराजांचा खरा इतिहास तळगाळापर्यंत पोहोचविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:05 IST2021-05-15T04:05:02+5:302021-05-15T04:05:02+5:30
औरंगाबाद : छत्रपती संभाजी राजांची ओळख संस्कृत पंडित, प्रतिभावंत कवी, उदार अंतःकरणाचा प्रजाहितदक्ष राजा म्हणून आहे. मात्र, बखरकारांच्या साहित्यांवर ...

संभाजीराजांचा खरा इतिहास तळगाळापर्यंत पोहोचविण्याची गरज
औरंगाबाद : छत्रपती संभाजी राजांची ओळख संस्कृत पंडित, प्रतिभावंत कवी, उदार अंतःकरणाचा प्रजाहितदक्ष राजा म्हणून आहे. मात्र, बखरकारांच्या साहित्यांवर १९७० पर्यंत झालेल्या नाटकांद्वारे त्यांची बदनामीच जास्त करण्यात आली. त्यामुळे संभाजीराजेंचा खरा इतिहास समाजाच्या तळागाळातील माणसांपर्यंत पोहचविण्याची खरी गरज आहे, असे प्राचार्य पठाण यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीराजे याच्या ३६४ व्या जयंतीनिमित्त लोकसंवाद फाऊंडेशनच्या वतीने विशेष 'संवाद सत्राचे' आयोजन करण्यात आले होते. इतिहासाचे अभ्यासक प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांनी ‘छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्यकर्तृत्वाची प्रासंगिकता’ या विषयावर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यांनी संभाजी महाराजांच्या देदीप्यमान, पराक्रमी कार्यकाळाची साक्षेपी मांडणी केली. बखरकारांनी तसेच विविध नाटकांच्या माध्यमातून संभाजी राजांची बदनामी केली ती वा.सी. बेंद्रे, डाॅ. कमल गोखले, सेतू माधवराव पगडी, रियासतकार सरदेसाई, जयसिंगराव पवार आदी इतिहासकारांनी खोडून काढली. शंभुराजे दूरदृष्टी, पराक्रम, शौर्य, स्वाभिमान, क्षात्रतेज, रयतेची कणव असलेला राजा होता. असा महापराक्रमी राजा महाराष्ट्रात होऊन गेला हे मराठी माणसांचे भाग्य आहे. त्यांचा इतिहास स्फूर्तिदायक आहे. त्यांच्या चरित्र अभ्यासातून नव्या पिढाला ऊर्जा मिळते. स्वाभिमानाचे व पराक्रमाचे बाळकडू मिळते. म्हणून संभाजीराजेंचे कार्यकर्तृत्व नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय गवळी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. हंसराज जाधव यांनी केले, तर प्रा.डाॅ. शैलेश आकुलवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी लोकसंवादचे अध्यक्ष डाॅ. राजेश करपे, संस्थेचे सचिव उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते, उपाध्यक्ष डाॅ. बळीराम धापसे, डाॅ. कैलास अंभुरे, कोषाध्यक्ष डाॅ. रामचंद्र काळुंखे, प्रा. डाॅ. शाम कदम. प्रा. डाॅ. मनोहर सिरसाट अभ्यासक, प्राध्यापकांसह संशोधक विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.