वैजापूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुसऱ्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने चालक जागीच ठार झाला. तर एकजण जखमी झाला. हा अपघातसमृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडला. शेख अन्वर शेख गफार (वय ४०, रा. आवार, ता. खामगाव), असे या घटनेतील मयताचे नाव आहे. तर चालकाचा भाचा शेख महंमद शेख असरार (१९, रा. शेगाव) हा जखमी झाला.
समृद्धी महामार्गावरून शेख अन्वर हा ट्रक (एमएच २८ बीबी ८०८१) मध्ये खामगाव येथून तूर भरून घेऊन मुंबईकडे जात होता. त्यावेळी जांबरगाव शिवारात समोरील एका चालकाने त्याचा ट्रक (एमएच आरजे ५० जीए ५२४९) अचानक बाजूला घेतला. त्यामुळे अंदाज न आल्याने अन्वर यांच्या ट्रकने पाठीमागून त्यास जोराची धडक दिली. या अपघातात चालक शेख अन्वर ठार झाला. तर सोबत ट्रकमध्ये बसलेला शेख महंमद जखमी झाला. अपघातानंतर दुसऱ्या ट्रकचा चालक फरार झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षारक्षक रिजवान सय्यद, शिवाजी बेळे, पोलिस उपनिरीक्षक लहासे, शेख, पाटील, अरबाज चौधरी, हवालदार किसन गवळी यांनी घटनास्थळी जाऊन मयत व जखमी यांना रुग्णवाहिकेतून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात मयताची उत्तरीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी शेख महंमद यांच्या फिर्यादीवरून दुसऱ्या चालकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.