येणेगूर : कंटेनर नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या चालकास अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत चोरट्यांनी ५८ हजाराचा मुद्देमाल लंपास केला.याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सिमेंट पोती वाहून नेणारा कंटेनर राष्ट्रीय महामार्गा क्र. ९ वरील भोसगा पुलानजीक आला असता, अचानक बिघाड झाल्याने सदरील कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. चालक बी. रवी चापला भानोत (रा. सूर्यातांडा) हे ट्रकच्या कॅबिनमध्ये झोपलेला असताना मध्यरात्रीच्या सुमारास जीपमधून तीन चोरटे आले. त्यांनी कॅबीनमध्ये प्रवेश मिळवून चालकास दमदाटी केली. तसेच १० हजार रुपये रोख रक्कमेसह कंटेनरमधील डिझेल, टायर, स्टेफनी असा एकूण ५८ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी भानोत यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुरुम पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा अधिक तपास पोउपनि आर.ए. मोमीन, पोेहेकॉ गोरोबा कदम हे करीत आहेत. (वार्ताहर)
ट्रकचालकास चोरट्यांनी लुटले
By admin | Updated: March 19, 2015 00:16 IST