शिवसेनेशी पंगा घेणारा अजून पैदा झाला नाही

By Admin | Updated: July 29, 2016 01:11 IST2016-07-29T01:00:49+5:302016-07-29T01:11:18+5:30

औरंगाबाद : महापालिकेतील शिवसेनेचे आरोग्य सभापती आत्माराम पवार आणि भाजप गटनेते बापू घडामोडे यांचा पुतण्या अतुल घडामोडे यांच्यातील हाणामारीनंतर

The troublemaker with the Shiv Sena is not yet born | शिवसेनेशी पंगा घेणारा अजून पैदा झाला नाही

शिवसेनेशी पंगा घेणारा अजून पैदा झाला नाही


औरंगाबाद : महापालिकेतील शिवसेनेचे आरोग्य सभापती आत्माराम पवार आणि भाजप गटनेते बापू घडामोडे यांचा पुतण्या अतुल घडामोडे यांच्यातील हाणामारीनंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत भाजपला गुरुवारी गर्भित इशारा दिला आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी गुरुवारी मनपा सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांच्या दालनात बैठक घेऊन शिवसेनेशी पंगा घेणारा अजून तरी पैदा झाला नसल्याचे सडेतोड उत्तर भाजपला दिले. येथून मागे सेना आणि भाजपात काय-काय झाले याचे दाखले देत कुणी कुणाला नामोहरम केले आहे, याचा संदर्भही दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
नगरसेवकाला मारहाण करण्याचे प्रकरण शिवसेनेच्या जिव्हारी लागले असून, त्याचे पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दानवे म्हणाले, शिवसेनेला धुणारा आणखीन जन्मला नाही. शिवसेनेने (भाजपचे नाव न घेता) कसे धुतले आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे.
बुधवारी रामनगर वॉर्डातील एका खाजगी हॉस्पिटलचा जैविक कचरा मनपाच्या घनकचरा संकलन करणाऱ्या रिक्षामध्ये भरला जात होता़ जैविक कचऱ्याच्या संकलनासाठी स्वतंत्र यंत्रणा असताना कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याचा प्रकार आरोग्य सभापती पवार यांच्यासमोर घडला़
त्यांनी या प्रकाराला आक्षेप घेतला; परंतु नगरसेवक तथा मनपातील भाजपचे गटनेते बापू घडामोडे यांचे पुतणे तेथे आले़ त्यांनी पवार यांच्याशी हुज्जत घातली़ थोड्याच वेळात त्याचे शाब्दिक चकमकीचे पर्यवसान हाणामारीत झाले़
पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मुंबईला गेल्याने पवार यांच्या जखमेवर मलम लावण्यासाठी बुधवारी कुणीही पुढे आले नाही. भाजप कार्यकर्त्यांचा मात्र घटनास्थळी जमाव आला होता़ त्यामुळे मनपात आणि शहरात शिवसेनेच्या आरोग्य सभापतींना भाजपने बेदम मारल्याची चर्चा होती.
याच प्रकारामुळे सभागृह नेते जंजाळ यांनी आरोग्य विभागाची आज बैठक घेतली़ या बैठकीला जिल्हाप्रमुख दानवे यांनीही हजेरी लावली़ पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, शिवसेना मार खाणारी नाही तर देणारी आहे़ शिवसेनेला धुणारा अजून जन्मला नाही़ उलट मनपात शिवसेनेने त्यांना कसे आणि किती वेळेस धुतले हे सगळ्यांनाच माहीत असल्याचा संदर्भ भाजपचे नाव न घेता दानवे यांनी दिला़ आरोग्य विभागाने हॉस्पिटल्समधील कचरा संकलनाकडे लक्ष द्यावे. अन्यथा विभागातील निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा या बैठकीत देण्यात आला.

Web Title: The troublemaker with the Shiv Sena is not yet born

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.