जागेअभावी तूर खरेदी ठप्प
By Admin | Updated: February 4, 2017 23:33 IST2017-02-04T23:32:52+5:302017-02-04T23:33:36+5:30
बीड तुरीची खरेदी चार दिवस बंद ठेवण्याची नामुश्की ओढवली आहे.

जागेअभावी तूर खरेदी ठप्प
राजेश खराडे बीड
जिल्ह्यात कृउबाच्या ठिकाणी ‘नाफेड’च्या वतीने तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची सोय झाली असली तरी गेल्या पंधरा वर्षांपासून तुरीची विक्रमी आवक झाली आहे. गोदामात माल ठेवण्यास जागा अपुरी पडत असून, कृउबा परिसरातही अशीच अवस्था असल्याने तुरीची खरेदी चार दिवस बंद ठेवण्याची नामुश्की ओढवली आहे.
२२ डिसेंबरपासून बीडसह इतर ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. शासकीय खरेदी केंद्रांवर तुरीला प्रतिक्विंटल ५ हजार १०० रुपये तर खासगी केंद्रांवर ४ हजार १०० रुपये भाव मिळतो. शासकीय केंद्रांवर धनादेशासाठी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागते. खासगी केंद्रांवर मात्र रोखीने व्यवहार होतात.
अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते. खरेदी केंद्रावर पांढरी, लाल व काळ्या तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. दिवसाकाठी जवळपास २ हजार क्विंटल आवक होत असल्याचे येथील केंद्रप्रमुख बी.बी. दहीफळे यांनी सांगितले. आठवड्याच्या सुरुवातीला पोत्यांअभावी दोन दिवस खरेदी ठप्प होती, तर आता जागेअभावी रविवारपासून बीड खरेदी केंद्रावर खरेदी-विक्री थांबविली असल्याचे नाफेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंबंधी कृउबाला अधिकृत पत्रही देण्यात आले आहे. बीड तालुक्यासह गेवराई, शिरूरमधून तुरीची आवक होत आहे. सर्व काही सुरळीत असतानाच आता चार दिवस खरेदी केंद्र बंद राहत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. यापूर्वीही बारदानाअभावी खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आले होते.
धनादेशासाठी वेटिंगमोठ्या प्रमाणात तुरीची आवक होत असल्याने नाफेडकडे खरेदी केलेला माल जाण्यास विलंब होत आहे.
परिणामी शेतकऱ्यांचे धनादेश काढण्यातही उशीर होत असून, १५ दिवसांऐवजी शेतकऱ्यांना महिनाभराची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी खेटे घालत आहेत.
जिल्हा मार्केटिंग कार्यालयात धनादेश दाखल होत असून, तेथील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत.