बिलोली तालुक्यातील २८ तलावांत ठणठणाट
By Admin | Updated: July 23, 2014 00:22 IST2014-07-23T00:01:03+5:302014-07-23T00:22:47+5:30
राजेश गंगमवार, बिलोली तालुक्यातील निजामकालीन २८ मालगुजारी तलावांतील जलसाठा समाप्त झाला आहे़ ऐन पावसाळ्यात जनावरांसाठी पाणीप्रश्न निर्माण झाला
बिलोली तालुक्यातील २८ तलावांत ठणठणाट
राजेश गंगमवार, बिलोली
तालुक्यातील निजामकालीन २८ मालगुजारी तलावांतील जलसाठा समाप्त झाला आहे़ ऐन पावसाळ्यात जनावरांसाठी पाणीप्रश्न निर्माण झाला असून खेड्यापाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ मागच्या दोन महिन्यांत अत्यल्प पाऊस झाल्याने तलावात जलस्तर वाढलाच नाही़
तालुक्यात निजामकालीन तलावांची संख्या २८ आहे़ प्रामुख्याने निजामाच्या राजवटीत निर्माण केलेल्या तलावांची देखरेख जवाबदारी सध्या जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाकडे आहे़ बिलोली शहरात दोन तलाव असून त्या पाठोपाठ कुंडलवाडी येथेही दोन मोठे तलाव आहेत़ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोग व्हावा असा उद्देश होता़ गाव पातळीवर जनावरांच्या पाण्यासाठी सोय होत होती़ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तलावांचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडे गेले़ मागच्या पाच वर्षात लोकसहभाग अंतर्गत तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता़ परिणामी जलस्तर वाढवण्यासाठी मदत झाली़ योगायोगाने गतवर्षी मोठा पाऊस झाला़ मागच्या पावसाळा हंगामात ९७० मि़मी़ पाऊस झाला जो की सरासरी पर्जन्यमानपेक्षा जास्तीचा होता़ पावसाळा जास्त झाल्याने प्रत्येक तलावातील पाणी वाढले़ विशेष म्हणजे, याच वर्षात बाभळी बंधाऱ्याचा प्रश्न निकाली लागला, त्यामुळे जमिनीतील जलस्तर उंचावला व तलावाची पाणीपातळी स्थिर राहिली़ तालुक्याला गोदावरी व मांजरा नदीचा वेढा आहे़ त्यामुळे तलावांची पाणीपातळी टिकून राहते़ गतवर्षीच्या अतिवृष्टीसारख्या पावसामुळे उन्हाळ्यातही तलाव भरून राहत आले़ आता मागच्या दीड-दोन महिन्यातील पाणीवापर, अत्यल्प पाऊस त्याचप्रमाणे बाभळीचा तेलंगणातील विसर्ग त्यामुळे जवळपास सर्वच तलाव कोरडेठाक पडले आहेत़
तालुक्यात बिलोली, कुंडलवाडी, अर्जापूर, बडूर, हिंगणी, दर्यापूर, भोसी, आळंदी, सावळी, मिनकी, सगरोळी, आंजनी, बामणी, केरूर, पिंपळगाव अशा २८ तलावांतील पाणीस्थिती गंभीर झाली आह़े़ पावसाळ्यातच जलसाठा वाढतो पण अतिशय कमी पाऊस झाल्याने जलस्तर वाढण्यात आला नाही़ सध्या सर्वच तलाव कोरडेठाक पडले आहेत़ तलावातील भाग आता कोरडवाहू शेतीप्रमाणे दिसत आहे़
काही मोठ्या तलावात कुठेतरी पाणी दिसून येते़ तेथे बेधडक मोटार लावून अनधिकृत शेती करण्यात येत आहे़ बिलोलीच्या १०० एकर तलावाचा भाग अतिक्रमणधारकांनी वेढला असून पाटबंधारे विभाग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे़ पावसाळ्यात उन्हाळ्याप्रमाणे स्थिती असून दरवर्षी पाण्याने भरून दिसणारे सर्व तलाव रिकामे दिसत आहेत़