अवैध धंद्यांवर धाडसत्र
By Admin | Updated: July 7, 2014 00:10 IST2014-07-06T23:15:48+5:302014-07-07T00:10:08+5:30
शिरीष शिंदे , बीड पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध दारु विक्री, मटका व अवैध वाहतुकीवर आळा बसावा यासाठी दहा पथके स्थापन केली

अवैध धंद्यांवर धाडसत्र
शिरीष शिंदे , बीड
पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध दारु विक्री, मटका व अवैध वाहतुकीवर आळा बसावा यासाठी दहा पथके स्थापन केली असून त्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी धाडसत्र सुरु आहे. गेल्या तीन दिवसात जवळपास पन्नासहून अधिक जागेवर पोलिसांनी धाडी टाकुन मटका बुकी ताब्यात घेतले आहेत तर हजारो रुपयांची चोरीटी दारु पकडली आहे.
शनिवारी जिल्ह्यात २१ ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकून हजारो रुपयांचा अवैध दारुसाठा पकडला आहे. चोरट्या पद्धतीने विक्री केली जात असलेली दारु व बिअर बनावट असु शकते, म्हणूनच चोरट्या पद्धतीने हा व्यवहार सुरु असतो. अवैधरीत्या दारु खरेदी करुन प्राशन करणे जिवावर बेतू शकते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा परवाना घेऊनच दारु, बिअर, विदेशी दारुची विक्री करता येते. विदेशी दार, देशी दारु विक्रीचा परवाना परमिट रुम व वाईन शॉप यांना देण्यात येतो तर केवळ बिअर विक्रीसाठी बिअर शॉपीनां विक्रीसाठीचा परवाना दिला जातो. मद्य विक्रीतून लाखो रुपयांचा महसूल राज्याला मिळतो मात्र चोरट्या पद्धतीने दारु विक्री केली जात असल्याने शासनाची लाखो रुपयांचा महसुल मिळत नाही.
चोरटी दारु असू शकते बनावट
जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरट्या पद्धतीने दारु विक्री केली जाते. ही दारु बनावट असल्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस व्यक्त करत आहेत. चोरटी दारु ही बनावट असण्याची शक्यता आहे. ही दारु स्पिरीटचा वापर करुन बनविण्यात आली असली तर तिचे प्राशन करणे आरोग्यास घातक ठरु शकते.
गेवराई तालुक्यामध्ये गत वर्षी बनावट दारु करण्यासाठीचे जवळपास आठ लाख रुपयांचे साहित्य गेवराई पोलिसांनी जप्त केले होते. बनावट दारु चोरट्या पद्धतीने विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी शनिवारी टाकले २१ छापे
जिल्ह्यात पोलिसांनी शनिवारी २१ ठिकाणी छापे टाकुन हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नेकनुर येथे एका ठिकाणी, सिरसाळा येथे दोन, पिंनळनेर येथे एक,माजलगाव शहर हद्दीत दोन, माजलगाव ग्रामीण हद्दीत एक, पाटोदा येथे चार, परळी दोन, अंमळनेर येथे एक, पिंपळनेर येथे एक, युसूफ वडगाव येथे एक, बीड ग्रामीण हद्दीत तीन, बीड शहर हद्दीत तर शिरुर तालुक्यात एक असे एकुण २१ ठिकाणी छापे टाकुन चोरटी दारु जप्त करण्यात आली आहे.