कचरा संकलनाच्या फेऱ्या कागदावरच
By Admin | Updated: November 28, 2014 01:16 IST2014-11-28T01:00:34+5:302014-11-28T01:16:50+5:30
औरंगाबाद : महापालिका कचरा संकलनात पूर्णपणे अपयशी ठरत असून, कचरा संकलित करून नारेगाव डेपोपर्यंत नेणाऱ्या वाहनांच्या फेऱ्यांत कोट्यवधी रुपयांचे अर्थकारण होत असल्याची शक्यता बळावली आहे

कचरा संकलनाच्या फेऱ्या कागदावरच
औरंगाबाद : महापालिका कचरा संकलनात पूर्णपणे अपयशी ठरत असून, कचरा संकलित करून नारेगाव डेपोपर्यंत नेणाऱ्या वाहनांच्या फेऱ्यांत कोट्यवधी रुपयांचे अर्थकारण होत असल्याची शक्यता बळावली आहे. मनपा आणि खाजगी वाहनांच्या किती फे ऱ्या होतात. याबाबत काहीही नोंद यांत्रिकी विभागाकडे नसल्याची माहिती समोर आली आहे.
वर्षाला १२ कोटी रुपयांचा खर्च खाजगी रिक्षा, ट्रॅक्टर, टिप्परच्या फेऱ्यांवर, तर पालिकेच्या टिप्पर दुरुस्तीवर १ कोटींहून अधिक खर्च होऊनही शहरात कचऱ्यांचे ढीग कायम आहेत.
नोव्हेंबर २०११ पासून मनपामार्फत कचरा संकलनाचे काम सुरू आहे. मनपात १,७०० च्या आसपास सफाई कर्मचारी आहेत. त्यातील अर्धे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर आहेत. रोज ५०० मेट्रिक टन कचरा उत्सर्जित होतो. पालिकेला सुमारे ४ हजार सफाई कर्मचाऱ्यांची गरज
आहे.
कचऱ्याचे टिप्पर उशिरा निघत असल्यामुळे घनकचरा विभागप्रमुख डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी यांत्रिकी विभागाला पत्र देऊन माहिती मागविली आहे. खाजगी टिप्पर्सची नोंद नसून पहाटे ५.३० ऐवजी ६.३० वा. टिप्पर कचरा संकलनासाठी जात आहेत. नारेगाव कचरा डेपोतील स्वच्छता निरीक्षकाकडे त्याची नोंद होते का, किती टिप्पर्सच्या किती फेऱ्या होतात. याची माहिती यांत्रिकी विभागाकडून मागविण्यात आली आहे. ४
रोशनगेट परिसरात आयुक्त महाजन स्वच्छतेची पाहणी करीत असताना एक अजब माहिती समोर आली. दुभाजकावर सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यास आयुक्तांनी विचारले, तू इथं केव्हापासून काम करतो आहेस, त्या कर्मचाऱ्याला ते आयुक्त आहेत हे माहिती नसावे. त्याने सांगितले, मी आज बायकोच्या जागी सफाई करीत आहे. मी व माझी बायको दोघेही मनपा सेवेत असल्याचेही त्याने आयुक्तांना सांगितले.
आयुक्तांना हा प्रकार कळल्यानंतर ते अवाक् झाले. त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याबाबत निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसऱ्या ठिकाणी जेव्हा आयुक्तांनी सफाईच्या वेळेत कर्मचारी काय करतात, हे पाहण्याचा प्रयत्न केला असता कर्मचारी सफाई कामाच्या वेळेत प्रार्थनेसाठी बाहेर गेल्याची माहिती समोर आली.